लखनऊच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह; मृताचे काका म्हणाले, "तिथे कसा गेला हे माहीत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:13 IST2024-12-19T10:07:06+5:302024-12-19T10:13:33+5:30
उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

लखनऊच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह; मृताचे काका म्हणाले, "तिथे कसा गेला हे माहीत नाही"
Lucknow Congress Worker Dies:उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बुधवारी काँग्रेसने विधानसभेच्या बाहेर जोरदार आंदोलन केले. याच दरम्यान, एक मोठी घटना समोर आली आहे. काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रभात पांडे असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रभात पांडे गोरखपूरहून आंदोलनात सहभागी होण्यासाठी आला होता. आंदोलनादरम्यान झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काँग्रेसने योगी सरकारकडे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभातच्या काकांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभात काकांनी माझा पुतण्या काँग्रेस कार्यालयात कसा पोहोचला हे मला माहीत नसल्याचे म्हटलं आहे. दुसरीकडे, आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या निर्दयतेमुळे काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा दावा उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष अजय राय यांनी केला.
प्रभातचे काका मनीष पांडे यांनी हुसेनगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून प्रभातची हत्या झाल्याचा दावा केला आहे. बुधवारी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास प्रभात कार्यालयात बेशुद्धावस्थेत पडल्याचा फोन काँग्रेस कार्यालयातून मला आला. फोन करणाऱ्याने सांगितले की प्रभात दोन तासांहून अधिक काळ तेथे पडून आहे. त्यानंतर मी ताबडतोब माझा नातेवाईक संदीप याला तिथे पाठवले. त्याने प्रभातला पाहिले आणि पाय थंड पडल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना कारमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रभात काँग्रेस कार्यालयात कसा पोहोचला हे मला माहीत नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले.
"माझ्या पुतण्याला कुठलाही आजार नव्हता. पण त्याच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचं दिसतंय. मला वाटतं की त्याची हत्या झाली असावी," असंही मनीष पांडे यांनी म्हटलं.
पोलिसांनी काय सांगितले?
"प्रभात पांडे यांना काँग्रेस कार्यालयातून बेशुद्ध अवस्थेत हजरतगंज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांच्या मते, प्रथमदर्शनी त्यांच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा दिसून आल्या नाहीत. याशिवाय, पॅनेलद्वारे शवविच्छेदन केले जाईल आणि संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाईल. अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल," अशी माहिती पोलिस उपायुक्त रवीना त्यागी यांनी दिली.
दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, खासगीकरण, कायदा व सुव्यवस्था आदी मुद्द्यांवरून काँग्रेस कार्यकर्ते राज्य सरकार विरोधात आंदोलन करत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी पोहोचू नये यासाठी विधानसभा संकुलाच्या सभोवताली बॅरिकेड्स लावण्यात आले होते.