राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजी; १०३० जागा जिंकून आघाडीवर
By देवेश फडके | Updated: January 31, 2021 20:45 IST2021-01-31T20:43:21+5:302021-01-31T20:45:53+5:30
राजस्थानात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसने १०३० जागांवर विजय मिळवून आघाडी मिळवली आहे.

राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजी; १०३० जागा जिंकून आघाडीवर
जयपूर :राजस्थानात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेसने १०३० जागांवर विजय मिळवून आघाडी मिळवली आहे. राजस्थानमध्ये ग्रामपंचायतीच्या ३०५९ जागांसाठी २८ जानेवारी रोजी निवडणुका झाल्या होत्या. सर्व जागांचे निकाल अद्याप घोषित झालेले नाहीत.
राजस्थानमध्ये ग्रामपंचायतीच्या ३०५९ जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. यापैकी २६५० जागांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. यात ६७० जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. एकूण निकाल जाहीर झालेल्या जागांपैकी १०३० जागा जिंकून काँग्रेस पक्ष आघाडीवर असून, भाजपला ९५० जागांवर विजय मिळाला आहे.
पतीची हत्या केली असेल तरी पत्नी फॅमिली पेन्शनसाठी पात्र; उच्च न्यायालयाचा निकाल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री गोविंद डोटासरा यांच्या लक्ष्मणगड येथे काँग्रेस आणि भाजपला समसमान जागांवर विजय मिळाला आहे. येथे कोणाचे पारडे जड होणार हे अपक्षावर अवलंबून असणार आहे. भंवर सिंह भाटी यांच्या देशनोक भागात काँग्रेस विजयी झाली आहे. देशनोक येथील एकूण २५ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेस तर १० जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
काँग्रेस पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या नेत्यांनीही मेहनत घेतली. काँग्रेस पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबाबत सर्व मतदारांचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी आभार मानले.