'सबका साथ, सबका विकास' काँग्रेसला कधीच कळणार नाही; राज्यसभेतून पीएम मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:45 IST2025-02-06T16:44:19+5:302025-02-06T16:45:03+5:30
'एससी-एसटी कायदा मजबूत करुन आम्ही दलित-आदिवासी समाजाप्रती आदर आणि बांधिलकी दाखवली. काँग्रेसने जातीवादाचे विष पेरले.'

'सबका साथ, सबका विकास' काँग्रेसला कधीच कळणार नाही; राज्यसभेतून पीएम मोदींचा हल्लाबोल
PM Narendra Modi in Rajyasabha : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 5 वा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेनंतर आज राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या मॉडेलमध्ये फक्त कुटुंबाला प्राधान्य दिले जाते. पण, आमच्या मॉडेलमध्ये देशाला प्राधान्य दिले जाते, अशी टीका पीएम मोदींनी केली.
सबका साथ, सबका विकास काँग्रेसला कधीच कळणार नाही
ओबीसी आयोगाच्या घटनात्मक दर्जाचा उल्लेख करत पीएम मोदी म्हणाले की, ओबीसींचा सन्मान आणि आदर आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. देशात ज्या ज्या वेळी आरक्षणाचा मुद्दा आला, तेव्हा त्याला योग्य पद्धतीने सामोरे जाण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. आमच्या सरकारने पहिल्यांदाच सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना 10 टक्के आरक्षण दिले. हे कोणाकडूनही हिसकावून न घेता दिले. एससी-एसटी, ओबीसींनीही त्याचे स्वागत केले. संपूर्ण देशाने हे मान्य केले.
आपल्या देशात दिव्यांगांचे कधीच ऐकून घेतले गेले नाही. पण, आम्ही दिव्यांगांच्या आरक्षणाचा विस्तार केला, योजना तयार केल्या आणि अंमलातही आणल्या. आम्ही ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांबाबत प्रामाणिक प्रयत्न केले. सबका साथ, सबका विकास हा मंत्र आम्ही सत्यात उतरवून दाखवला. पण, काँग्रेसला याचा अर्थ कधीच समजणार नाही. स्त्री शक्तीचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. त्यांना संधी मिळाली तर देशाच्या प्रगतीला अधिक गती मिळू शकेल. यासाठी आम्हीच नारी शक्ती वंदन कायदा आणला, असं मोदी म्हणाले.
2014 मध्ये आम्ही देशाला पर्यायी मॉडेल दिले
पीएम मोदी पुढे म्हणतात, 2014 मध्ये आम्ही देशाला पर्यायी मॉडेल दिले. आम्ही समाधानाचे मॉडेल दिले आहे, तुष्टीकरणाचे नाही. निवडणुका आल्या की छोट्या वर्गाला काहीतरी द्यायचे आणि नंतर काहीच नाही, अशी काँग्रेसची पद्धत होती. फक्त मतांचे राजकारण करण्यावर त्यांचा भर होता. भारताकडे जे काही संसाधने आहेत, त्यांचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपल्याजवळ जो काही वेळ आहे, तो वाया जाण्यापासून वाचवून प्रत्येक क्षणाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. कोणतीही योजना असो, ती ज्यांच्यासाठी बनवली, त्याचा 100 टक्के लाभ मिळायला हवा. एससी-एसटी कायदा मजबूत करून आमच्या सरकारने दलित-आदिवासी समाजाप्रती आदर आणि बांधिलकी दाखवली. पण, काँग्रेसकडून आज जातीवादाचे विष पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.