पंजाब, उत्तराखंडमध्ये Congressची सत्ता येणार, उत्तर प्रदेशात चमत्कार करणार, पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 08:31 IST2021-10-19T08:30:12+5:302021-10-19T08:31:43+5:30
Congress News: पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Uttarakhandमध्ये Congress पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. तर Punjabमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. मात्र मागच्यावेळपेक्षा काँग्रेसच्या जागा काही प्रमाणात घटतील, असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

पंजाब, उत्तराखंडमध्ये Congressची सत्ता येणार, उत्तर प्रदेशात चमत्कार करणार, पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेचा निष्कर्ष
नवी दिल्ली - पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यादरम्यान काँग्रेसने जनमताचा कानोसा घेण्यासाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमधून पक्षाला मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. मात्र मागच्यावेळपेक्षा काँग्रेसच्या जागा काही प्रमाणात घटतील, असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.
सध्या उत्तराखंडमध्ये भाजपाचे सरकार आहे. मात्र गेल्या पाच वर्षात भाजपाला लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. तर पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत सर्व्हे काँग्रेससाठी मोठा दिलासा देणारा आहे. मात्र कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बंडखोरी केल्याने त्यांचा प्रभाव असलेल्या भागात काँग्रेसच्या जागा घटू शकतात.
उत्तर प्रदेशमधील सर्व्हेचा विचार केल्यास राज्यात मागच्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी चांगली होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसच्या जागांमध्ये अनेकपटीने वाढ होईल, अशी शक्यताही वर्तवली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ७ जागांवर विजय मिळाला होता. मात्र गेल्या काही काळापासून प्रियंका गांधी यांनी दाखवलेल्या सक्रियतेमुळे पक्षसंघटनेला बळ मिळाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला असून, त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. तसेच भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष काही मोजक्या जागांवर मैत्रिपूर्ण लढती लढतील,असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
जिथे काँग्रेसच प्रबळ असेल तिथे सपा आपला दुबळा उमेदवार देईल. तर जिथे सपा मजबूत असेल तिथे काँग्रेस कमकुवत उमेदवार देईल. तसेच निवडणुकीचे निकाल अपेक्षेनुसार आले तर निवडणुकीनंतर सपा आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतील. मात्र इतर राज्यांमधून काँग्रेससाठी निवडणुकीचे निकाल तितकेसे समाधानकारक येताना दिसत नाही आहेत.