नवी दिल्ली: सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमानचं प्रोटोकॉल तोडून स्वागत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसनं निशाणा साधला. पाकिस्तानच्या तथाकथित दहशतवादविरोधी प्रयत्नांचं कौतुक करणाऱ्या व्यक्तीची गळाभेट घेऊन मोदी शहिदांचं स्मरण करतात का, असा सवाल काँग्रेसनं विचारला. भारतात येण्यापूर्वी सलमान यांनी पाकिस्तानला भेट दिली. त्यावेळी सौदी अरेबिया आणि पाकिस्ताननं दहशतवादविरोधी लढ्यासंदर्भात संयुक्त निवेदन दिलं. त्या निवेदनापासून सौदी अरेबियानं फारकत घ्या, असं मोदींनी सलमान यांना सांगावं, अशी मागणीदेखील काँग्रेसकडून करण्यात आली. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बिन सलमान आणि मोदींच्या गळाभेटीचा फोटो आणि पाकिस्तान-सौदीचं संयुक्त निवेदन याबद्दल एक ट्विट केलं. 'राष्ट्रहित विरुद्ध मोदींची गळाभेटीची कूटनीती' अशा शब्दांमध्ये सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधला. पाकिस्तानला 20 अब्ज डॉलर देण्याचं आश्सासन देणाऱ्या, त्यांच्या दहशतवादविरोधातील प्रयत्नांचं कौतुक करणाऱ्या व्यक्तीचं मोदींनी प्रोटोकॉल तोडून स्वागत केलं, अशी टीका त्यांनी केली. पुलवामातील शहिदांचं स्मरण करण्याची हीच पद्धत आहे का?, असा सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित केला. 'मोदीजी, पाकिस्तानसोबतच्या संयुक्त निवेदनापासून तुम्ही सौदी अरेबियाला फारकत घ्यायला सांगाल का? त्या निवेदनात मसूद अजहरसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची भारताची मागणी जवळपास फेटाळून लावण्यात आली आहे,' असं सुरजेवाला म्हणाले. काल रात्री सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान दिल्लीत दाखल झाले. मोदींनी विमानतळावर त्यांचं प्रोटोकॉल तोडून स्वागत केलं. सौदी राजपुत्राची पहिल्यांदाच द्विपक्षीय चर्चेसाठी भारताचं आले आहेत.
पाकिस्तानचं कौतुक करणाऱ्या सौदी राजपुत्राची गळाभेट कशासाठी?; काँग्रेसचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 19:08 IST