“काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 05:34 IST2024-12-16T05:33:35+5:302024-12-16T05:34:20+5:30
जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत. ईव्हीएमबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सर्वांची भूमिकादेखील एकसारखी असायला हवी, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले.

“काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने ईव्हीएमबद्दलच रडगाणे बंद करून, आहे तो निकाल स्वीकारण्याचा सल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या सहकारी पक्षाला दिला. निवडणुकीत विजय झाला तर निकाल स्वीकारायचा आणि पराभव झाला तर यंत्राला दोष द्यायचा असे चालणार नसल्याचे नमूद करत ईव्हीएमबद्दलच्या तक्रारी थांबवण्याचे आवाहन एका वृत्तसंस्थेशी चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी केले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान याच ईव्हीएमद्वारे तुमचे शंभरहून अधिक सदस्य संसदेत जातात, तेव्हा तुम्ही पक्षाचा विजय झाला म्हणून जल्लोष साजरा करतात. मात्र, काही महिन्यांनंतर निवडणुकीचे निकाल वेगळे लागले म्हणून आम्हाला ईव्हीएम पसंत नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही.
...तर लढूच नका!
जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत. ईव्हीएमबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सर्वांची भूमिकादेखील एकसारखी असायला हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले. हरयाणा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल काँग्रेसकडून शंका उपस्थित हाेत आहे. काँग्रेस नेत्यांनी तर मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली आहे.