“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:20 IST2025-10-12T12:20:21+5:302025-10-12T12:20:21+5:30
P Chidambaram On Operation Blue Star: काही दिवसांपूर्वी मुंबईतील २६/११ प्रकरणी गौप्यस्फोट गेल्यानंतर आता ऑपरेशन ब्ल्यू स्टारबाबत काँग्रेसचेच नेते पी. चिदंबरम यांनी मोठे विधान केले आहे.

“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
P Chidambaram On Operation Blue Star: भारतीय सैन्यातील कोणत्याही अधिकाऱ्याचा अनादर करण्याचा माझा मानस नाही. मात्र, सुवर्ण मंदिर परत मिळवण्याचा हा चुकीचा मार्ग होता. काही वर्षांनंतर आम्ही सैन्याला बाहेर ठेवून योग्य मार्ग दाखवून दिला. ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा चुकीचा मार्ग होता. मला वाटते की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जीव गमावून त्याची किंमत चुकवावी लागली, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे.
हिमाचल प्रदेशातील कसौली येथे खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात पी. चिदंबरम यांनी सहभाग घेतला. या महोत्सवात ते पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या "दे विल शूट यू, मॅडम" या पुस्तकावर चर्चा करत होते. सन १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या शिखांचे सर्वांत पवित्र धर्मस्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांना नियंत्रित करण्यासाठी लष्करी कारवाईला परवानगी दिली होती. याबाबत काँग्रेसवर शीख बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येतो. आता काँग्रेसचेच नेते पी. चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची पद्धत चुकीची होती, असे म्हटले आहे.
हा निर्णय एकट्या इंदिरा गांधींचा नव्हता
पुढे बोलताना पी. चिदंबरम म्हणाले की, हा निर्णय एकट्या इंदिरा गांधींचा नव्हता. भारतीय सैन्य, पोलीस, गुप्तचर विभाग आणि नागरी सेवेचा संयुक्त निर्णय होता. याचा दोष केवळ इंदिरा गांधी यांच्यावर टाकता येणार नाही. तुम्ही ते कराल का?, असा प्रतिप्रश्न चिदंबरम यांनी केला. आताच्या घडीला पंजाबची खरी समस्या आर्थिक संकटाची आहे, खलिस्तानची नाही, असे चिदंबरम यांनी नमूद केले.
दरम्यान, तत्कालीन यूपीए सरकारवर मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेनंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे टाळले. माझ्या मनात या हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार होता, परंतु सरकारने सैन्य कारवाई न करण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट पी.चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.