"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:06 IST2025-11-06T11:06:06+5:302025-11-06T11:06:44+5:30
BJP JP Nadda And Congress Rahul Gandhi : भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मतचोरीच्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला.

"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मतचोरीच्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा पराभव जवळ येत असल्याची जाणीव झाल्याने काँग्रेस नेते असे "खोटे" दावे करत असल्याचं म्हटलं आहे.
जेपी नड्डा यांनी असाही आरोप केला की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते देशाची बदनामी करण्यासाठी, तरुणांना भडकवण्यासाठी आणि देशात अराजकता निर्माण करण्यासाठी निवडणुकीत वारंवार मतचोरीचे निराधार दावे करत आहेत आणि SIR ला विरोध करत आहेत.
'मतचोरीच्या' विरोधात आपली मोहीम सुरू ठेवत, राहुल गांधी यांनी बुधवारी हरियाणाच्या मतदार यादीशी संबंधित डेटा सादर केला आणि दावा केला की गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत असाच प्रकार घडला.
राहुल गाँधी ने अभी से मान लिया है कि बिहार चुनाव में कांग्रेस की लुटिया डूबने वाली है। चुनाव बिहार में हो रहे हैं और राहुल गाँधी दिल्ली में फर्जी प्रेस कांफ्रेंस कर हरियाणा की बातें कर रहे हैं।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) November 5, 2025
एक ओर राहुल गाँधी प्रेस कांफ्रेंस में आकर वोट चोरी का रोना रोते हैं और दूसरी ओर SIR… pic.twitter.com/rxIoZr3sOQ
एका व्हिडीओ मेसेजमध्ये नड्डा म्हणाले, "राहुल गांधी यांनी आधीच मान्य केलं आहे की काँग्रेस हरणार आहे. बिहारमध्ये निवडणुका होत आहेत आणि राहुल गांधी दिल्लीत पत्रकार परिषद घेत हरियाणाबद्दल बोलत आहेत कारण त्यांना हे समजले आहे की बिहारमध्ये महाआघाडीचा पराभव होणार आहे."
"म्हणूनच ते सबबी शोधू लागले आहेत. पूर्वी ते त्यांच्या पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरत होते. आता, जेव्हा ते त्यांचे खोटे दावे सिद्ध करू शकत नाहीत आणि ईव्हीएमला सर्वोच्च न्यायालयानेही क्लीन चिट दिली आहे, तेव्हा त्यांनी एसआयआरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे."
"एकीकडे, राहुल गांधी मत चोरीचा आरोप करणाऱ्या पत्रकार परिषदा घेत आहेत आणि दुसरीकडे ते एसआयआरला विरोध करत आहेत. राहुल गांधींना स्वतःला काय हवं आहे हे माहित नाही." भाजप अध्यक्षांनी आरोप केला की जेव्हा जेव्हा राहुल गांधी परदेशात जातात तेव्हा ते काही "महाज्ञान" घेऊन परततात आणि देशाला बदनाम करण्यासाठी कथा रचू लागतात.
नड्डा यांनी आरोप केला की, "राहुल गांधींचं एकमेव उद्दिष्ट देशाला बदनाम करणं, तरुणांना भडकवणं, देशात अराजकतेचं वातावरण निर्माण करणं आहे, परंतु देशातील तरुणांना सत्य माहित आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहेत. ते देशाच्या विकास आणि प्रगतीसोबत आहेत."