"हिंसाचार, जिवितहानी होऊनही...!" एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 22:49 IST2025-02-09T22:48:34+5:302025-02-09T22:49:15+5:30
...आता, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

"हिंसाचार, जिवितहानी होऊनही...!" एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी इंफाळ राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकजे आपला राजीनामा सादर केला. तत्पूर्वी एन. बिरेन सिंह यांनी आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आता, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
काय म्हणाले राहुल गांधी -
यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "साधारणपणे दोन वर्षांपर्यंत भाजपचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी मणिपूरमध्ये फूट पाडली. मणिपूरमध्ये हिंसाचार, जिवितहानी आणि भारताच्या विचारांचा नाश होऊनही पंतप्रधान मोदींनी त्यांना हटवले नाही. एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून स्पष्ट होते की, लोकांचा वाढता दबाव, सुप्रीम कोर्टाकडून चौकशी आणि काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाने त्यांना असे करायला भाग पाडले. मात्र, सर्वात महत्वाचे काम, राज्यात शांतता प्रस्थापित करणे आणि मणिपूरच्या लोकांचे घाव भरून काढणे आहे."
"पंतप्रधानांनी तातडीने मणिपूरचा दौरा करावा" -
काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी तातडीने मणिपूरला भेट द्यायला हवी, लोकांचे म्हणणे ऐकायला हवे आणि तेथील परिस्थिती कशीपद्धतीने सामान्य होईल यासंदर्भात सरकारची योजना सांगायला हवी." तसेच, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, "उद्या, काँग्रेस पक्ष मणिपूर विधानसभेत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होता. मात्र, वातावरण ओळखून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला."
मणिपूरमध्ये 2 वर्षे हिंसाचार सुरू
मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यातील मैतेई आणि कुकी समुदायांमधील वाढत्या तणावामुळे अनेक हिंसक चकमकी झाल्या, परिणामी शेकडो लोकांनी प्राण गमावले आणि हजारो लोकांना घर सोडावे लागले. जमीन, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व याबाबत मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये दीर्घकाळापासून वाद आहे. दरम्यान, राज्यातील सरकार पक्षपाती असल्याचा आरोप एका समुदायाकडून केला जात आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यात मोठ्या प्रमाणावर चकमकी झाल्या. केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे अतिरिक्त सुरक्षा दलही तैनात केले आहे.