Rahul Gandhi : "फक्त काँग्रेस नेत्यांनाच इथे चौकशीसाठी बोलवलं जातं का?"; राहुल गांधींचा ईडी अधिकाऱ्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 10:11 IST2022-06-14T09:48:23+5:302022-06-14T10:11:54+5:30
Congress Rahul Gandhi And ED : राहुल गांधी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. पहिल्या दिवशी त्यांची तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली.

Rahul Gandhi : "फक्त काँग्रेस नेत्यांनाच इथे चौकशीसाठी बोलवलं जातं का?"; राहुल गांधींचा ईडी अधिकाऱ्यांना सवाल
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवारी चौकशी करण्यात आली. सकाळच्या सुमारास राहुल गांधी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. पहिल्या दिवशी त्यांची तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली. ईडीने त्यांना मंगळवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं आहे. याच दरम्यान "फक्त काँग्रेस नेत्यांनाच इथे बोलवलं जातं का? असा थेट सवाल ईडी राहुल गांधींनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल यांनी तपास अधिकाऱ्यांना त्यांचे नाव आणि हुद्द्याबाबत विचारलं. यासोबत त्यांनी ईडी कार्यालयात फक्त काँग्रेस नेत्यांचीच चौकशी केली जाते की तुम्ही दुसऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवता? असा प्रश्न ईडी अधिकाऱ्यांना विचारला आहे. राहुल गांधींच्या या प्रश्नावर कोणत्याच अधिकाऱ्याने उत्तर दिलं नाही. सोमवारी सकाळी सुरुवातीला त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर लंच ब्रेकदरम्यान राहुल गांधी सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर ते पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात पोहोचले आणि पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात तब्बल साडेपाच तास त्यांची चौकशी करण्यात आली.
ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला खासगी प्रश्न विचारल्यानंतर मालमत्ता आणि आर्थिक देवाण-घेवाणीबाबत प्रश्न राहुल यांना विचारण्यात आले. राहुल गांधी यांना यंग इंडिया आणि आणि असोसिएट्स जर्नल्स लिमिटेडशी संबंधित प्रश्न विचारले. भारतामध्ये तुमची किती संपत्ती आहे आणि कुठे कुठे आहे?, किती बँकांमध्ये खाते आहे. तसेच त्यामध्ये किती रक्कम जमा आहे?, परदेशातील कुठल्या बँकेत खाते आहे? त्यामध्ये किती रक्कम जमा आहे, परदेशात कुठली संपत्ती आहे, असल्यास कुठे आहे?, यंग इंडियनशी कसा संबंध आला? असे प्रश्न विचारले.
ईडीने राहुल गांधींना प्रश्न विचारून यंग इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या पार्टनरशिपचा पॅटर्न, आर्थिक देवाण-घेवाण आणि प्रवर्तकांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केलाच राहुल गांधींना यंग इंडियनची स्थापना, नॅशनल हेराल्डच्या संचालन आणि पैशांच्या कथित हस्तांतरणाबाबत प्रश्न विचारले जातात. यंग इंडियनच्या प्रवर्तक आणि शेअरधारकांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही इतर सदस्यही आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.