काँग्रेस नेते राऊत यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 04:28 PM2019-10-30T16:28:00+5:302019-10-30T16:34:20+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.

congress nitin raut meet sonia gandhi in delhi | काँग्रेस नेते राऊत यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

काँग्रेस नेते राऊत यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. नितीन राऊत उत्तर नागपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या मुंबईत होणार आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या, (गुरुवार) मुंबईत होणार असल्याने या बैठकीला महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

नितीन राऊत उत्तर नागपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. सोनिया गांधी यांची निवासस्थानी भेट घेतल्यानंतर बोलताना आमदार नितीन राऊत म्हणाले, विधानसभा निकालानंतर एक सौजन्य म्हणून भेट घेतली. दिवाळीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना  शुभेच्छा दिल्या. तसेच सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाली. महाराष्ट्रातील दलित व आदिवासींच्या घटनात्मक अधिकारावर होत असलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात यापुढे लढा देण्यात येईल, असेही आमदार नितीन राऊत यांनी सांगितले.

गटनेता निवडीसाठी बैठक

काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या (गुरुवार) मुंबईत होणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे 44 आमदार निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या गटनेतेपदी कुणाची निवड होणार याबाबत उत्सुकता आहे. यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचे समजते. मावळते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नाना पटोले, नितीन राऊत यांची नावे चर्चेत असल्याचे समजते.  यात बैठकीत विधिमंडळ गटनेता निवडण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. या बैठकीला पक्षाचे निरीक्षक म्हणून माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत गटनेत्याच्या निवडीचा प्रस्ताव मांडला जाईल परंतु त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिले जाणार असल्याचे समजते.

काँग्रेस 35 पत्रकार परिषदा घेणार, अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारला घेरणार

देशावर आलेले मंदीचे सावट आणि ढासळती अर्थव्यवस्था यामुळे गेल्या काही काळापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अडचणीत आलेले आहे. आता अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसकडून देशभरात 35 पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदांमधून देशातील आर्थिक परिस्थितीबाबत मोदी सरकारला सवाल विचारले जातील. 1 ते 8 नोव्हेंबरदरम्यान काँग्रेसकडून या पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच 5 ते 15 नोव्हेंबरदरम्यान काँग्रेसकडून देशभरात आर्थिक प्रश्नांवरून आंदोलन करण्यात येणार आहेत. याचदरम्यान 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. 

 

Web Title: congress nitin raut meet sonia gandhi in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.