"पंजाबमध्ये जंगलराज आणि अराजकता"; नवज्योत सिंग सिंद्धूंचा AAP वर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:46 IST2022-04-05T15:44:31+5:302022-04-05T15:46:06+5:30
पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पुन्हा एकदा 'आप'च्या नवनिर्वाचित सरकारवर निशाणा साधला आहे.

"पंजाबमध्ये जंगलराज आणि अराजकता"; नवज्योत सिंग सिंद्धूंचा AAP वर हल्लाबोल
पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पुन्हा एकदा भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील 'आप'च्या नवनिर्वाचित सरकारवर निशाणा साधला आहे. सोमवारी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. "या ठिकाणी जंगलराज आहे. पंजाबमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे. या ठिकाणी कोणलाच कायद्याचा धाक नाही," असं सिद्धू म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्त्याच्या कथित हत्येप्रकरणी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी सिद्धू लुधियानाला पोहोचले होते. तेव्हा त्यांनी पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. "मी पंजाबमध्ये अशी अराजकता यापूर्वी कधीही पाहिली नाही. कोणालाही कायद्यचा धाक नाही. हे जंगलराज आहे. दिवसाधवळ्या हत्या केल्या जात आहेत," असं सिद्धू म्हणाले.
"ज्यांनी लोकांना उत्तर दिलं पाहिजे असे लोक गुजरातमध्ये आहेत. पंजाबच्या लोकांवर दररोज हल्ले होत आहेत. गुरुदासपूरमध्ये चार जणांची हत्या करण्यात आली. लुधियानामध्येही हत्या झाली होती. संपूर्ण साज्यात अशा घटना घडत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे," असं म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
जर हे दिल्लीत घडलं असतं तर...
सानौरमध्ये एका काँग्रेस नेत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा दावा करत सिद्धू यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. "तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगत तुमचे लोक दिल्लीत न्यायालयात जात आहेत. पंजाबमधील लोकांच्या जीवाचीही काळजी करा. जर दे दिल्लीत घडलं असतं तर तुम्ही याला गुंडगिरी म्हटलं असतं. आता पाहा पंजाबमध्ये काय होतंय पाहा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे," असंही सिद्धू ट्वीट करत म्हणाले होते.