आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यात मागच्या काही काळापासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असून, आता हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. गौरव गोगोई हे १५ दिवस पाकिस्तानमध्ये राहिले, तसेच त्यांनी तिथे असं काही केलं, ज्याचा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला फायदा झाला, असा आरोपही सरमा यांनी केला. मात्र गौरव गोगोई यांनी हिमंता बिसवा सरमा यांच्या आरोपांना कुठलंही उत्तर दिलेलं नाही.
आज गुवाहाटी येथे लोकसेवा भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हिमंता बिसवा सरमा म्हणाले की, गौरव गोगोई पाकिस्तानमध्ये गेले होते याबाबत आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्यांच्या पाकिस्तानमधील येण्याजाण्याची नोंद अटारी सीमेवर आहे. गौरव गोगोई हे सुमारे १५ दिवस इस्लामाबादमध्ये थांबले होते. सुरुवातीचे सात दिवस त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती. मात्र नंतर ती भारतात परतली. मात्र गौरव गोगोई तिथेच थांबले.
हिमंता बिसवा सरमा पुढे म्हणाले की, गौरव गोगोई यांनी केलेल्या काही कामामुळे पाकिस्तानच्या लष्कराला अप्रत्यक्षपणे मदत मिळू शकते. दरम्यान, गौरव गोगोई हे भारतात परलते तेव्हा सुमारे ९० तरुण तरुणींना त्यांनी पाकिस्तानच्या दूतावासामध्ये नेले. यामधील अनेक जणांना आपण पाकिस्तानच्या दूतावासात जात आहोत, हेही सांगण्यात आले नव्हते, ही खरोखर चिंतेची बाब आहे, असेही सरमा म्हणाले.