मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 06:09 IST2025-08-02T06:08:40+5:302025-08-02T06:09:43+5:30
या गैरप्रकारात निवडणूक आयोगातील जे लोक सामील आहेत, त्यांनी देशद्रोह केला असून, शोधून काढून कारवाई करायला भाग पाडू. त्यांना कदापिही माफ केले जाणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने भाजपसाठी मतांची चोरी केली असून, त्याबाबत काँग्रेसकडे ॲटमबॉम्ब ठरू शकतील, असे भक्कम पुरावे आहेत असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. हे पुरावे उजेडात आल्यावर निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा राहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या गैरप्रकारात निवडणूक आयोगातील जे लोक सामील आहेत, त्यांनी देशद्रोह केला असून, त्यांना कदापिही माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बिहारमधील मतदारयादीचा मसुदा शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. ही यादी त्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेनंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मोहिमेवर विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत तीव्र आक्षेप घेतला आहे.
‘गैरकृत्य करणाऱ्यांना शिक्षा होणारच’
राहुल यांनी सांगितले की, निवडणूक आयोगात गैरकृत्ये करणारे हे देशाच्या विरोधात काम करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्की आहे. कोणी निवृत्त झाले असतील, सध्या ते कुठेही राहात असतील, त्यांना शोधून कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू. राहुल गांधी कर्नाटकमधील मतदारयाद्यांतील गोंधळ ५ ऑगस्ट रोजी उघड करणार आहेत.
बिनबुडाच्या आरोपांकडे लक्ष देऊ नका : आयोग
निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करत आहे हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांकडे लक्ष देऊ नका, असे आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी सांगितले. दररोज केले जाणाऱ्या अशा बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही. कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना न जुमानता सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने आपले काम करत राहावे, असे आदेश आयोगाने दिले आहेत. राहुल यांनी आयोगाला कधीही कोणतेही पत्र लिहिले नाही, असेही आयोगाने म्हटले.