"मुद्दा 1994 चा..."; जॉर्ज सोरोससंदर्भातील आरोपांवर काय म्हणाल्या प्रियांका गांधी? सरकारवर थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:47 IST2024-12-10T14:45:03+5:302024-12-10T14:47:46+5:30
"सभागृह चालावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची सरकारची इच्छा नाही."

"मुद्दा 1994 चा..."; जॉर्ज सोरोससंदर्भातील आरोपांवर काय म्हणाल्या प्रियांका गांधी? सरकारवर थेट निशाणा
सध्या संसदेत गौतम अदानी आणि जॉर्ज सोरोस मुद्द्यावरून जबरदस्त गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षांकडून गौतम अदानी आणि संभल हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून सत्ताधारी पक्षांनीही जॉर्ज सोरोस मुद्द्यावरून विरोधकांना घेरायला सुरवात केली आहे. यातच आता जॉर्ज सोरोस प्रकरणावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी भाष्य केले आहे.
"सोरोस प्रकरण 1994 चे, ज्याचे..." -
प्रियांका म्हणाल्या, "सोरोस प्रकरण 1994 चे आहे. ज्याचे कुणाकडेही कुठलेही रेकॉर्ड नाही. ज्यासंदर्भात बोलत आहेत, काय बोलत आहेत, त्यासंदर्भात कुणालाही माहीत नाही. खरे तर अदानींसंदर्भात यांना चर्चा होऊ द्यायची नाही, म्हणून हे सर्व सुरू आहे. लाच घेण्यात आली आहे, हे यांना माहीत आहे, लोक मोठमोठ्या वीज बिलामुळे त्रस्त आहेत, हे यांना माहीत आहे आणि याचे यांच्याकडे काहीही उत्तर नाही, हेही यांना माहीत आहे. यांनी लाच खाललेली आहे."
प्रियांका पुढे म्हणाल्या, "सभागृह चालावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची सरकारची इच्छा नाही. हे लपत आहेत, जेणे करून सभागृह चालणार नाही आणि यांना उत्तर द्यावे लागणारन नाही."
किरेन रिजिजू यांचा सवाल -
तत्पूर्वी, लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी जॉर्ज सोरोस यांचा मुद्दा उपस्थित करत, काँग्रेसचा त्यांच्याशी काय संबंध? शुक्रवारी लोकसभेचे कामकाज तहकूब होण्यापूर्वी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही जॉर्ज सोरोसच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राहुल गांधींना 10 प्रश्न विचारले होते. सोरोस मुद्द्यावरून राज्यसभेत गेल्या दोन दिवसांपासून गदारोळ सुरू आहे.
जेपी नड्डा यांनी केला होता गंभीर आरोप -
तत्पूर्वी, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी, जॉर्ज सोरोस फाउंडेशनकडून निधी पुरवल्या जाणाऱ्या एका संस्थेशी सोनिया गांधी यांचा संबंध असल्याचा आरोप केला होता. जिने कथितपणे कश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या विचारांचे समर्थन केले होते.