नवी दिल्ली: मध्य प्रदेशात महिन्याभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनंभाजपाचा पराभव केला. आता याच यशाची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून अभिनेत्री करिना कपूरला लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरला आहे. करिना तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्यानं भोपाळ मतदारसंघ जिंकणं सोपं होईल, असं राजकीय गणित काँग्रेस नगरसेवकांनी मांडलं आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाकडे आहे. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसची डाळ शिजत नाही. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडायचं असल्यास करिना कपूर यांना उमेदवारी द्या, असा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाकडे धरला आहे. तरुणांमध्ये करिनाची लोकप्रियता खूप मोठी आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड आहे. याचा मोठा फायदा करिना कपूर आणि पर्यायानं काँग्रेसला होईल, असा दावा काँग्रेस नगरसेवक गुड्डू चौहान आणि अनीस खान यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे.करिना कपूर पतौडी घराण्याची सून असल्यानं त्याचा फायदा तिला जुन्या भोपाळमध्ये होईल. याशिवाय महिला वर्गदेखील मोठ्या प्रमाणात करिनाला मतदान करेल, असा विश्वास नगरसेवक अनीस खान यांनी व्यक्त केला. करिनाचा पती सैफ अली खान आणि भोपाळ यांचा घनिष्ठ संबंध आहे. पतौडी कुटुंब अनेक वर्षांपासून भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर, सोहा अली खान अनेकदा भोपाळला येतात. भोपाळ आणि पतौडी घराण्यातील याच कनेक्शनचा फायदा करिनाला होईल, असा विश्वास काँग्रेसमधील अनेक नेत्यांना वाटतो. लवकरच यासाठी काँग्रेसचे नगरसेवक मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार आहेत.
करिना कपूर भोपाळमधून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 09:12 IST