राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:55 IST2025-10-11T13:54:49+5:302025-10-11T13:55:23+5:30
Nobel Prize And Congress Rahul Gandhi: नोबेल पुरस्कारावरून डोनाल्ड ट्रम्प थयथयाट करत असताना काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट मारिया मचाडो यांच्याशी केली आहे.

राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
Nobel Prize And Congress Rahul Gandhi: दक्षिण अमेरिकेतील लोकशाही चळवळीला बळ देणाऱ्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेसाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार आपल्यालाच मिळावा, यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला. नोबेल पुरस्कारावरून एकीकडे डोनाल्ड ट्रम्प थयथयाट करत असताना दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी भारताच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची तुलना थेट मारिया मचाडो यांच्याशी केली आहे.
एकेकाळचा लोकशाहीप्रधान असलेला व्हेनेझुएला हुकूमशाहीकडे वळाला. या देशाचे राजकीय व सांस्कृतिक स्वरूप बदलले. अशा अस्थिर परिस्थितीत २० वर्षांपूर्वी मारिया कोरिना मचाडो हे नेतृत्व जनतेतून जन्मास आले. मचाडो यांनी मुक्त वातावरणात, निष्पक्षपाती, पारदर्शी निवडणुका घेण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. पण आपल्या भूमिकेवरून त्या तसूभरही हलल्या नाहीत. २०२४च्या निवडणुकीत मचाडो यांनी सलग १२ वर्षे सत्तेत असलेले हुकूमशाही प्रवृत्तीचे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो मोरेस यांच्या विरोधात रणशिंग फुंकले. व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देणे, तसेच हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांना २०२५ या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला. यातच काँग्रेस नेत्यांनी मारिया मचाडो यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी केली.
मारिया मचाडो यांच्याशी केली राहुल गांधींची तुलना
सुरेंद्र राजपूत यांनी मारिया कोरिना मचाडो आणि पाचवेळा खासदार राहिलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोटो एक्सवर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात की, यावेळेचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना संविधानाचे रक्षण केल्याबद्दल मिळाला आहे. भारतात विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत.
काँग्रेस नेत्यांच्या पोस्टवरून भाजपाने काढले चिमटे
काँग्रेस नेत्यांनी केलेल्या पोस्टवर भाजपाने चिमटा काढला आहे. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एक्सवर पोस्ट करत सुरेंद्र राजपूत यांच्या पोस्टचा समाचार घेतला. पूनावाला यांनी राहुल गांधींना नोबेल देण्याची मागणी विचित्र असल्याचे म्हटले. तसेच त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकतो पण तो १) ढोंगीपणा २) खोटे बोलणे ३) ९९ निवडणुकांमध्ये पराभव होणे ४) १९७५ आणि १९८४ मध्ये लोकशाही आणि संविधानाची हत्या करणे. या कारणांसाठी त्यांना नक्कीच पुरस्कार मिळायला हवा, असा खोचक टोला पूनावाला यांनी लगावला.
दरम्यान, नोबेल शांतता पुरस्काराच्या विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी मला फोन केला आणि म्हटले की, तुमच्या सन्मानार्थ मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. कारण तुम्ही खरोखरच या पुरस्कारासाठी पात्र होता. पण मी त्यांना अजिबात म्हणालो नाही की, मला तो पुरस्कार द्या. मला वाटते त्यांनी केले असेल. मी त्यांना शक्य तितकी मदत करत आहे. मला सर्वांत जास्त आनंद या गोष्टीचा आहे की, मी आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचवले, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
Bizarre
Congress is demanding Nobel Prize for Rahul Baba
He would get it if there one meant for
1) hypocrisy
2) lying
3) losing elections 99 times !
4) murdering democracy and constitution in 1975 and 1984 pic.twitter.com/21hFknEtcz— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) October 11, 2025