"सवयीप्रमाणे मोदीजींनी पुन्हा एकदा असत्याग्रह केला", राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 20:47 IST2020-12-18T20:40:59+5:302020-12-18T20:47:24+5:30
rahul gandhi : शुक्रवारी एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबद्दल सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

"सवयीप्रमाणे मोदीजींनी पुन्हा एकदा असत्याग्रह केला", राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. "सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला," अशी टीका करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना कृषी कायद्यांसंदर्भात सल्लाही दिला आहे.
शुक्रवारी एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबद्दल सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. "सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐका, कृषी कायदे मागे घ्या," असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारवर निशाणा साधला.
आदत के अनुसार मोदी जी ने आज फिर असत्याग्रह किया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 18, 2020
किसानों की बात सुनो, कृषि विरोधी क़ानून वापस लो!
दरम्यान, देशात कृषी कायद्यांवरून घमासान सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कृषी कायद्यांना विरोध केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांना विरोध करत आहे. १५-२० दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केले आहे. कृषी कायदे मागे घेण्याची व हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कृषी कायदे एका रात्रीत आले नाहीत - मोदी
मध्य प्रदेशातील शेतकरी संमेलनात शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नव्या कृषी कायद्यांवरुन विरोध करत असलेल्या विरोधीपक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या आश्वासनांची आठवण विरोधकांना करुन दिली. "जे काम खरंतर २५ वर्षांपूर्वी व्हायला हवे होते. ते आम्हाला आज पूर्ण करावे लागत आहे. कृषी कायदे काही एका रात्रीत तयार झालेले नाहीत. यावर गेल्या दोन दशकांपासून केंद्र, राज्य सरकार आणि संघटना चर्चा करत आहेत. आम्ही फक्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम करत आहोत", असे मोदी म्हणाले.