काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमारांकडून मोहीम फत्ते; मुख्यमंत्र्यांबाबतही मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:00 PM2024-02-29T19:00:40+5:302024-02-29T19:01:21+5:30

काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हिमाचल प्रदेशात जात सूत्र हाती घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Congress leader DK Shivakumar maes A big decision regarding the Chief Minister in himachal pradesh | काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमारांकडून मोहीम फत्ते; मुख्यमंत्र्यांबाबतही मोठा निर्णय

काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमारांकडून मोहीम फत्ते; मुख्यमंत्र्यांबाबतही मोठा निर्णय

Himachal Pradesh ( Marathi News ) : हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग करत भाजप उमेदवाराला मदत केली. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर झालं होतं. मात्र काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हिमाचल प्रदेशात जात सूत्र हाती घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. शिवकुमार यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसत असून सध्या तरी सरकार स्थिर असल्याचं दिसत आहे. डी. के. शिवकुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्षातील सर्व मतभेद दूर झाले असून आमचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेन, असा विश्वास व्यक्त केला आहे.

डी. के. शिवकुमार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, "राज्यात सध्या काँग्रेसचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्व सुखविंदर सिंह सुख्यू हे करत आहेत. पूर्ण पाच वर्षांसाठी काँग्रेसचंच सरकार राहावं, अशी सर्व आमदारांची इच्छा आहे. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून सुख्यू यांना निवडलं आहे आणि तेच मुख्यमंत्री राहतील," असं शिवकुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

"राज्यसभा निवडणुकीत काही गोष्टी चुकीच्या घडल्याचं मुख्यमंत्री सुख्यू यांनी मान्य केलं आहे. मात्र आता भविष्यात तसं घडणार नाही. सर्व आमदारांशी आम्ही वैयक्तिकरित्या बोललो आहोत. तसंच मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसोबतही चर्चा केली आहे. सर्व मतभेद दूर झाले असून आम्ही सरकार आणि पक्षात समन्वय राहावा, यासाठी पाच ते सहा सदस्यांची एक समन्वय समिती स्थापित करत आहोत," अशी माहितीही डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे.

दरम्यान,  क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सर्व सहा बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत काँग्रेसने दिले होते. त्यानुसार हिमाचल प्रदेशचे  विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया यांनी या सहा बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं आहे. यामध्ये सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. 
 

Web Title: Congress leader DK Shivakumar maes A big decision regarding the Chief Minister in himachal pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.