मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने सुरू केली मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 10:23 IST2025-08-11T10:23:31+5:302025-08-11T10:23:59+5:30
लोकांनी संबंधित वेबलिंकवर नोंदणी करून या मागणीला पाठिंबा देण्याची मागणी

मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने सुरू केली मोहीम
नवी दिल्ली : निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दाव्यांबाबत वाद वाढत असतानाच काँग्रेसने एक वेब पेज सुरू केले आहे. तेथे मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाला उत्तरदायी करण्याच्या मागणीसाठी व डिजिटल मतदार यादी देण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लोकांना नोंदणी करता येणार आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मतचोरी ही एक व्यक्ती, एक मत या मूलभूत लोकशाही सिद्धांतावर हल्ला आहे. स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ-पारदर्शक मतदार यादी गरजेची आहे. त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाला आमची मागणी आहे की, पारदर्शकता दाखवावी व डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करावी. त्यामुळे जनता व राजकीय पक्षांना त्याचे स्वतःचे आडिट करता येईल. लोकांनी संबंधित वेबलिंकवर नोंदणी करून या मागणीला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
मत लोकशाहीचा पाया; त्यावर भाजपचा हल्ला
वेबपेजवर गांधी यांचा एक व्हिडीओही आहे. यात भाजप व निवडणूक आयोगातील संगनमताने निवडणुकीत मोठी गुन्हेगारी फसवणूक झाल्याचा दावा करताना ते दिसत आहेत.
त्यांनी कर्नाटकच्या एका निवडणूक मतदारसंघाच्या विश्लेषणाचा हवाला देऊन हा प्रकार संविधानाच्या विरुद्ध एक गुन्हा असल्याचे म्हटले होते.
पोर्टलवर एक संदेशही देण्यात आलेला असून, यात म्हटले आहे की, मत आमच्या लोकशाहीचा पाया आहे. मात्र, यावर भाजपकडून पद्धतशीर हल्ला केला जात आहे. यात निवडणूक आयोगही सामील आहे.