सततच्या पराभवांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ, संघटनेत होणार मोठे फेरबदल, राहुल गांधींचा प्लॅन तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:14 IST2025-02-13T16:12:58+5:302025-02-13T16:14:16+5:30
Congress News: फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत.

सततच्या पराभवांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ, संघटनेत होणार मोठे फेरबदल, राहुल गांधींचा प्लॅन तयार
लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळाली नसली तरी मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे काँग्रेसला हुरूप आला होता. मात्र नंतर मागच्या सात आठ महिन्यांच्या काळात झालेल्या हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली, तर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत खळबळ उडाली असून, पराभवातून धडा घेत पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत बदलांची ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होणार होती. मात्र हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुकांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षसंघटनेत तातडीने बदल करण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांना संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही उपस्थित होते. काँग्रेच्या संघटनेमध्ये मुलभूत आणि व्यापक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संघटनेच्या सरचिटणीसांचं काम तीन भागात विभागलं जाण्याची शक्यता आहे. तसेच या तीन भागांसाठी तीन वेगवेगळे सरचिटणीस नेमले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदानंतर सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या या पदाची शक्ती कमी होणार आहे. सद्यस्थितीत के. सी. वेणुगोपाल हे या पदावर आहेत. तसेच ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असून, ते पक्षसंघटनेतील बलाढ्य नेते मानले जातात. आता या पदाच्या अधिकारांची विभागणी झाल्यास वेणुगोपाल यांची ताकद विभागली जाऊ शकते.
सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसकडून सुमारे सहा नवे सरचिटणीस नियुक्त करणार आहे. तर काही जणांना नारळ दिला जाईल. तसेच बिहार, राजस्थान, तेलंगाणा, हरयाणा, पंजाब आणि आसाम या राज्यातील प्रभारी बदलले जाऊ शकतात. तसेच महाराष्ट्र, ओदिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांसह एकूण आठ राज्यांचे प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळ हे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात.
सध्या प्रियंका गांधी ह्या पक्षाच्या सरचिटणीस आहेत. मात्र त्यांच्याकडे कुठल्याही राज्याचा प्रभार नाही आहे. त्यांच्याकडे कुठल्याही मोठ्या राज्याचं प्रभारीपद सोपवलं जाऊ शकतं. बी. के. हरिप्रसाद, सचिन राव, मीनाक्षी नटराजन, श्रीनिवास बी.व्ही, परगट सिंह, अजयकुमार लल्लू, जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांकडेही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.