सोहराबुद्दीन प्रकरणाच्या तपासात काँग्रेसचा खोडा - अरुण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 01:33 AM2019-01-01T01:33:36+5:302019-01-01T01:33:54+5:30

मुंबईच्या न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ‘सोहराबुद्दीन याने बहुधा आत्महत्या केली असावी!’, असे खोचक भाष्य टिष्ट्वटरवर टाकून राहुल गांधी यांनी भाजपाच्या बड्या नेत्यांना वाचविण्यासाठी सरकारनेच हा तपास नीट होऊ दिला नाही, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले होते.

Congress Digging in the Sohrabuddin case: Arun Jaitley | सोहराबुद्दीन प्रकरणाच्या तपासात काँग्रेसचा खोडा - अरुण जेटली

सोहराबुद्दीन प्रकरणाच्या तपासात काँग्रेसचा खोडा - अरुण जेटली

नवी दिल्ली : गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्यात प्रामुख्याने पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व २२ आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरविण्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रथमच उत्तर देत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या तपासात काँग्रेसनेच खोडा घातला होता, असा उलटा आरोप केला.
मुंबईच्या न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ‘सोहराबुद्दीन याने बहुधा आत्महत्या केली असावी!’, असे खोचक भाष्य टिष्ट्वटरवर टाकून राहुल गांधी यांनी भाजपाच्या बड्या नेत्यांना वाचविण्यासाठी सरकारनेच हा तपास नीट होऊ दिला नाही, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले होते. या प्रकरणातील मूळ आरोपींमध्ये गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री व भाजपाचे आताचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही आरोपी होते.
अंतिम सुनावणी होण्यापूर्वीच न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले होते.
राहुल गांधी यांच्या टीकेला जेटली यांनी ‘टिष्ट्वटर’वर ‘हू किल्ड सोहराबुद्दीन इन्व्हेस्टिगेशन?’ अशी पोस्ट लिहून सोमवारी उत्तर
दिले.
जेटली यांनी लिहिले की, सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याहून न्यायालयाने नोंदविलेले हे निरीक्षण अधिक समर्पक आहे की, सत्याचा छडा लावण्याऐवजी तपासाचा रोख काही राजकीय व्यक्तींकडे वळविण्यासाठी ‘सीबीआय’ने सुरुवातीपासूनच या प्रकरणाचा नीटपणे तपास केला नाही. तपासी संस्थांच्या नि:पक्षपातीपणाविषयी आता कळवळा दाखविणाºयांनी आपण स्वत: सत्तेवर असताना ‘सीबीआय’ला मोकळेपणाने काम करू दिले का, याचे आत्मचिंतन करावे, असे जेटली यांनी म्हटले.

मनमोहनसिंग यांना दिलेल्या पत्राचा उल्लेख
सप्टेंबर २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना आपण लिहिलेल्या एका १५ पानी पत्राचा जेटली यांनी दाखला दिला. त्या पत्रात जेटली यांनी सोहराबुद्दीन, तुलसी प्रजापती, इशरत जहाँ, राजिंदर राठोड व हरेन पंड्या यांच्या चकमक प्रकरणांत कसा राजकीय हस्तक्षेप केला जात आहे, याकडे डॉ. सिंग यांचे लक्ष वेधले होते.
जेटली म्हणतात की, माझ्या त्या पत्रातील प्रत्येक शब्द खरा असल्याचे पुढील पाच वर्षांत सिद्ध झाले आहे. काँग्रेसने आपल्या देशाच्या तपासी यंत्रणांची कशी वाट लावली, याचाच हा नि:संदिग्ध पुरावा आहे.

Web Title: Congress Digging in the Sohrabuddin case: Arun Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.