वक्फ सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, काँग्रेस, असदुद्दीन ओवेसी यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:40 IST2025-04-05T10:36:56+5:302025-04-05T10:40:33+5:30
Waqf Amendment Bill: संसदेने मंजूर केलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद तसेच एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिले.

वक्फ सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, काँग्रेस, असदुद्दीन ओवेसी यांचे आव्हान
नवी दिल्ली - संसदेने मंजूर केलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद तसेच एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिले. हे विधेयक राज्यघटनेतील तरतुदीचा भंग करणारे आहे असा दावा त्यांनी याचिकेत केला. सदर विधेयकाला लोकसभेने गुरुवारी व राज्यसभेने शुक्रवारी मंजुरी दिली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारने हे विधेयक तयार केले.
काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांनी या याचिकेत म्हटले आहे की, वक्फ सुधारणा विधेयकाव्दारे वक्फची मालमत्ता आणि त्यांच्या व्यवस्थापनावर मनमानी निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येणार आहे.
नितीशकुमारांना धक्का
वक्फ सुधारणा विधेयकाला जनता दल(यू) पक्षाने पाठिंबा दिल्याने त्या पक्षातील नदीम अख्तर, राजू नय्यर, तबरेज सिद्धिकी अलीग, मोहम्मद शाहनवाज मलिक आणि मोहम्मद कासिम अन्सारी या पाच नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राजू नय्यर यांनी आपल्या म्हटले आहे की, जनता दल(यू)ने विधेयकाच्या बाजूने मतदान केले. याबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजी असून, ती जनभावना लक्षात घेऊन मी पक्षत्याग केला आहे.
विधेयकाविरोधात महिला, मुले उतरली रस्त्यावर; पोलिस सतर्क
वक्फ सुधारणा विधेयक संसदेने संमत केल्यानंतर त्याविरोधात देशातील काही राज्यांत शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध केला. या निदर्शनांत महिला, मुलेही सहभागी झाली. अनेक आंदोलकांना पोलिस ताब्यात घेत आहेत.
हे विधेयक संमत झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीसह काही ठिकाणी पोलिसांनी ध्वजसंचलन केले. प्रार्थनास्थळांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेश अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अश्फाक सैफी यांना हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे.
मुस्लिमांच्या अधिकारांवर या विधेयकाने गदा येत आहे. हिंदू, जैन आणि शीख धर्माच्या मंडळांना कोणतीही व्यक्ती पैसे देऊ शकते. मात्र वक्फमध्ये तुम्ही बदल केला. हे कलम १५ आणि २१ चे उल्लंघन आहे.
- असदुद्दीन ओवेसी, खासदार
वक्फ सुधारणा विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्यामुळे अन्याय व भ्रष्टाचाराचे पर्व संपले असून, आता न्याय, समानतेच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. वक्फ बोर्डाच्या कारभाराचे लेखापरीक्षण देखील होईल. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
संविधानातील तत्त्वे, तरतुदी यांच्यावर सरकार हल्ले चढवत असून त्याविरोधात काँग्रेस संघर्ष करणार आहे. विधेयकात त्रुटी असून त्याला विरोध आहे. विरोध असूनही विधेयक मंजूर केले गेले. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
वक्फ विधेयक मुस्लिमांच्या विरोधात असून ते घटनाबाह्य असल्याची टीका विरोधी पक्षांनी लोकसभा व राज्यसभेतील चर्चेत केली. वक्फ कायद्याविरोधात आम्ही न्यायालयात लढा जारी ठेवणार आहोत. - जयराम रमेश, काँग्रेस
वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात जरूर आव्हान द्यावे, मात्र त्यांनी लांगुलचालन करण्याच्या राजकारणापायी अल्पसंख्याक समाजातील लोकांना चिथावणी देऊ नये . - रविशंकर प्रसाद, भाजपचे नेते
वक्फ सुधारणा विधेयक हे मुस्लिमांच्या विशेषत: महिलांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आले आहे. वक्फ सुधारणा विधेयक संसदेने मंजूर केले असल्याने त्याचा विरोधी पक्षांना स्वीकार करावाच लागेल.
- दिनेश शर्मा, खासदार, भाजप
सोनिया गांधी यांनी माफी मागावी : भाजप
सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपच्या खासदारांनी शुक्रवारी गदारोळ माजवला. सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. वक्फ सुधारणा विधेयक हा संविधानावर थेट हल्ला असून, समाजामध्ये सतत ध्रुवीकरण घडविण्याच्या भाजपच्या रणनीतीचा तो एक भाग आहे, असे वक्तव्य सोनिया गांधींनी केले होते.