"जेव्हा आम्ही एकत्र शपथ घेतली"; काँग्रेस नेत्याने सांगितली रेखा गुप्तांची ३० वर्षांपूर्वीची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:14 IST2025-02-20T12:56:32+5:302025-02-20T13:14:12+5:30
काँग्रेसच्या अलका लांबा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांसोबतचा एक संस्मरणीय फोटो शेअर केला आहे

"जेव्हा आम्ही एकत्र शपथ घेतली"; काँग्रेस नेत्याने सांगितली रेखा गुप्तांची ३० वर्षांपूर्वीची आठवण
Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्या रामलीला मैदानावर भाजपच्या नवनिर्वाचित आमदार रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीतील विधानसभेचा निवडणूक निकाल लागल्यानंतर ११ दिवसांनी बुधवारी अखेर दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळाला. २७ वर्षांनी दिल्लीमध्ये पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर भाजपने पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री बनवलं आहे. त्यामुळे देशभरातून रेखा गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडूनही रेखा गुप्ता यांचे अभिनंदन करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या अलका लांबा यांनी रेखा गुप्ता यांचा राजकारणाच्या शाळेतून दिल्लीच्या राजकीय शिखरावर पोहोचण्याचा प्रवास सांगितला आहे.
रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पक्ष विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा केली होती. मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा होताच अलका यांनी सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये रेखा गुप्ता यांचे अभिनंदन करताना त्यांनी हा फोटो संस्मरणीय असल्याचे म्हटलं. रेखा गुप्ता यांच्यासह त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स यूनियन्या पदाधिकारी म्हणून शपथ घेतली होती.
"१९९५ मधला हा संस्मरणीय फोटो - जेव्हा रेखा गुप्ता आणि मी एकत्र शपथ घेतली. मी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाकडून दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष पद जिंकले होते आणि रेखा यांनी एबीव्हीपीकडून सरचिटणीस पद जिंकले होते. रेखा गुप्ता यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि आम्हा दिल्लीवासीयांना आशा आहे की यमुना माता स्वच्छ होईल आणि मुली सुरक्षित असतील," असं अलका लांबा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या निवडणुकीपासून सुरू झाला होता. रेखा गुप्ता यांनी १९९५ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निवडणूक लढवली आणि सरचिटणीसपद भूषवले होते. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. एबीव्हीपी आणि भाजपमध्ये वेगवेगळ्या पदांवर असताना त्या आता मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचल्या. दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनमधील त्या पहिल्या नेत्या आहेत ज्यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
1995 की यह यादगार तस्वीर - जब मैंने और रेखा गुप्ता ने एक साथ शपथ ग्रहण की थी-
— Alka Lamba 🇮🇳 (@LambaAlka) February 19, 2025
मैंने @nsui से दिल्ली विश्वविद्यालय छात्र संघ (DUSU) #अध्यक्ष पद पर जीत हासिल की थी और रेखा ने #ABVP से #महासचिव पद पर जीत हासिल की थी- रेखा गुप्ता को बधाई और शुभकामनाएँ.
दिल्ली को चौथी महिला… pic.twitter.com/csM1Rmwu9y
काँग्रेसच्या अलका लांबा १९९५ मध्ये नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या तिकिटावर दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स यूनियनच्या अध्यक्ष बनल्या आणि नंतर आपच्या आमदार झाल्या. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९५ मध्ये रेखा गुप्ता देखील दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स यूनियनच्या सरचिटणीस बनल्या.