कॉन्फिडंट ग्रुपचे मालक सीजे रॉय यांचा मृत्यू; आयकर अधिकाऱ्यांसमोर स्वतःवर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:01 IST2026-01-30T18:57:44+5:302026-01-30T19:01:27+5:30
आयकर पथकाच्या छाप्यामुळे रॉय मानसिक तणावात असल्याची माहिती...

कॉन्फिडंट ग्रुपचे मालक सीजे रॉय यांचा मृत्यू; आयकर अधिकाऱ्यांसमोर स्वतःवर झाडली गोळी
CJ Roy: रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील अग्रणी कंपनी कॉन्फिडन्ट ग्रुप (Confident Group) चे संस्थापक आणि मालक सीजे रॉय (CJ Roy) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूमधील कार्यालयात त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले.
घटनेच्या दिवशीच आयकर विभागाची झडती
प्राथमिक माहितीनुसार, आजच आयकर विभागाने (Income Tax Department) रॉय यांच्या ठिकाणांवर शोधमोहीम (सर्च ऑपरेशन) सुरू केली होती. सायंकाळच्या सुमारास बंगळुरूतील अनेपाळ्या परिसरातील त्यांच्या कार्यालयात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अशोकनगर पोलीस ठाण्याची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आयकर अधिकाऱ्यांसमोरच घडली घटना?
आयकर तपासामुळे रॉय मानसिक तणावाखाली होते. आज दिवसभर त्यांच्या विविध ठिकाणी तपास सुरू होता. याच दरम्यान, आयकर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
कॉन्फिडेंट ग्रुपचे 65 हून अधिक लक्झरी प्रकल्प
2005 साली स्थापन झालेल्या कॉन्फिडेंट ग्रुपने आतापर्यंत 65 पेक्षा अधिक लक्झरी प्रकल्प पूर्ण केले आहेत. कंपनी निवासी अपार्टमेंट्स आणि व्हिला, व्यावसायिक संकुले, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी आणि मनोरंजन क्षेत्रांत कार्यरत आहे.
दुबईपर्यंत विस्तार
मूळचे केरळचे असलेले सीजे रॉय यांनी स्वित्झर्लंडमधील SBS बिझनेस स्कूल येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉन्फिडेंट ग्रुपने केरळ आणि बंगळुरू येथे अनेक नामांकित लक्झरी प्रकल्प राबवले, तसेच दुबईतील बाजारपेठेतही विस्तार केला.