भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 06:29 IST2025-04-28T06:28:00+5:302025-04-28T06:29:27+5:30
सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली असून, याचा सर्वांत जास्त फटका पंजाबला बसू शकतो. ५३० किमीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून ४५,००० एकर शेती आहे.

भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
अमृतसर/फिरोजपूर : भारत-पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांनी दोन दिवसांत पीक काढणी पूर्ण करावी व शेत रिकामे करावे, असे निर्देश सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दिले आहेत. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढलेला असताना बीएसएफने हे निर्देश दिले आहेत, हे विशेष.
सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली असून, याचा सर्वांत जास्त फटका पंजाबला बसू शकतो. ५३० किमीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून ४५,००० एकर शेती आहे. अमृतसर, तरणतारण, फिरोजपूर आणि फाल्जिका जिल्ह्यांमध्ये याबाबत घोषणा करून शेतकऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. भांगला या सीमावर्ती भागातील शेतकरी राजबीर सिंग भांगला यांनी सांगितले की, दोनच दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी बीएसएफने सांगितले आहे. वर्षभरासाठी जनावरांना चारा महत्त्वाचा असून, शांतता होताच आम्हाला तेथे काम करण्याची परवानगी दिली पाहिजे.
राष्ट्रीय सुरक्षा सर्वतोपरी
बीएसएफच्या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, दोन्ही देशांतील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे, हे खरे आहे.
आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या जाणतो.
परंतु, राष्ट्रीय सुरक्षा सर्वतोपरी आहे, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शेतकऱ्यांनी भविष्यातील कोणतीही असुविधा टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्याने केले.
नेमकी कारणे कोणती?
शेतकऱ्यांना शेत लवकर रिकामे करण्यास सांगण्यामागे विविध कारणे आहेत, असे सुरक्षा दलांनी सांगितले.
उभे असलेले पीक सीमेवर गस्त घालताना शत्रू भागाची टेहळणी करण्यात अडथळा ठरू शकते.
घुसखोर याचा गैरफायदा घेऊ शकतात.
शेत रिकामे झाल्यास बीएसएफला या भागावर नजर ठेवण्यास सोपे जाईल.
यंत्रसामग्रीचा पुरवठा प्रशासनाकडून करावा
लवकर पीक काढणी करण्यासाठी प्रशासनाने जास्तीच्या यंत्रसामग्रीचा पुरवठा करावा, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. लखविंदर सिंग यांनी सांगितले की, प्रशासनाने अशावेळी पुढे यावे व लवकर शेत रिकामे करण्यास मदत करावी.