Delhi Election: दिल्लीत आम आदमीचेच राज्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 08:12 IST2020-02-12T06:23:58+5:302020-02-12T08:12:21+5:30
भाजपची मजल ८ जागांवर : काँग्रेसचा भोपळा कायम; ‘गोली मारो’च्या विखारी प्रचाराला मतदारांचे उत्तर

Delhi Election: दिल्लीत आम आदमीचेच राज्य!
सुरेश भुसारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘गोली मारो’पासून सुरू झालेल्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देताना दिल्लीकरांनी विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षालाच विजयी केले. दुहेरी आकडा न गाठता येणाऱ्या भाजपला दुहेरी आठ ठिकाणी विजय मिळाला, तर काँग्रेसला यंदाही भोपळाही फोडता आला नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा नवी दिल्ली मतदारसंघातून १९ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. तेच तिसºयांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील.
मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर तासाभरताच दिल्लीत आपची सत्ता येण्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या २२ वर्षांपासून दिल्लीत सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजप नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला यंदाही सुरूंग लागला आहे. गेल्या महिनाभराच्या विखारी प्रचारामुळे दिल्लीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. या प्रचाराला केजरीवाल यांनी अत्यंत संयत उत्तर दिल्याने मतदारांचा विश्वास जिंकण्यात अखेर आपचे उमेदवार यशस्वी ठरले.
दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान संपल्यानंतर लगेचच एक्झिट पोलमधून ‘आप’ला बहुमत मिळेल, असेच भाकित वर्तविण्यात आले होते. तसाच कौल जनतेने दिला. आपच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी, मंत्र्यांनी वर्चस्व कायम राखला. दिल्लीतील १२ जिल्ह्यांमधील केंद्रांवर मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासून आपच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी कायम राहिली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घरात बसून निकाल पाहिले. यावेळी त्यांच्यासह त्यांचे रणनीतीकार प्रशांत किशोर हेही होते.
‘आप’लाच सत्ता मिळणार, हे स्पष्ट होताच कार्यालयात टोपीधारी कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून व गुलाल उधळून आंनदोत्सव साजरा केला. दुपारनंतर या उत्साहात मुख्यमंत्री केजरीवालही सामील झाले होते. त्यांनी तिथे सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानलेच, पण एवढा मोठा जनादेश दिल्याबद्दल दिल्लीकर जनतेला उद्देशून ‘आय लव्ह यू’ असे उद्गारही काढले.
गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा ५ टक्के कमी मतदान कमी झाले होते. याचा फटका कुणाला बसेल, याची चर्चा मतमोजणी सुरू होईस्तोवर चालली होती. पण टपालाने आलेल्या मतांमधूनही कौल आम आदमी पक्षाला आल्याचे स्पष्ट झाले. तरीही भाजपचे सारे नेते व दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी आम्हालाच बहुमत मिळेल, सुरुवातीचे कल बदलतील, असा विश्वास व्यक्त करीत होते. काँग्रेस नेत्यांना मात्र आपल्या पराभवाचा आधीच अंदाज आला होता. त्यामुळे त्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाकडे वळलेच नाहीत.
वादग्रस्त विधानांचा फायदा झाल्याची चर्चा
प्रचारात भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने केल्याने वातावरण तापले होते. केंद्रीय अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘गोली मारो...’ तर खासदार परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले होते. या प्रचाराचा भाजपला फायदा मिळणार का, याची चर्चा सुरू होती.
प्रचाराचा सारी धुरा गृहमंत्री अमित शहा यांच्यावर होती. त्यांनी जवळपास २०० प्रचार सभांद्वारे दिल्ली पिंजून काढली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीत दोन सभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे देशातील बहुतेक दिग्गज नेते दिल्लीत प्रचाराला आले होते.
मात्र एवढ्या प्रचारानंतरही भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. आता त्यात ५ ची भर पडली.
‘आप’ व केजरीवालांवरील अपेक्षांचे ओझे वाढले
नवी दिल्ली: शाहीन बाग आंदोलन, सीलमपूर भागांत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील मोर्चात झालेला किरकोळ हिंसाचार, निर्भयाच्या आरोपींना फाशी, जेएनयूतील कथित राष्ट्रविरोधी घोषणाप्रकरणी आरोपपत्र अशा असंख्य मुद्यांवर आम आदमी पक्षाने घेतलेली संदिग्ध भूमिकाच मतदारांनी स्वीकारली, असे निकालांतून दिसत आहे.
आप अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करते, असे भाजप नेते बोलत होते. त्याचा फटका बसण्याची इतकी भीती अरविंद केजरीवाल यांना वाटली की त्यांनी हनुमान मंदिरच गाठले. त्यावरूनही राजकारण तापले. यंदाची निवडणूक स्थानिक विरूद्ध स्थलांतरित अशीही झाली.
'मोफत'मुळे पडणारा आर्थिक खड्डा बुजवण्याची कसरत आपला करावी लागेल. यावरून भाजप भविष्यात जोदार टीका करण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण व बहुसंख्यविरोधी या भाजपने ठसवलेल्या प्रतिमेतूनही आपला बाहेर यावे लागेल.
काँग्रेसचे पानिपत
काँग्रेसला तर ४ टक्के मतेच मिळाली आणि त्या पक्षाच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. काँग्रेसचे सर्व उमेदवार तिसºया क्रमांकावर होते. सरचिटणीस प्रियंका गांधी व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारांसाठी प्रचार केला, परंतु मतदारांनी या प्रचाराला गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीपेक्षा काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत १८ टक्क्यांनी घट झाली आहे.
आपचे दिग्गज विजयी
आपच्या प्रमुख विजयी उमेदवारांत अरविंद केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदिया, गोपाल राय, आतिशी, दिलीप पांडे, राघव चढ्ढा, राखी बिडला, सत्येंद्र जैन,
शोएब इक्बाल, सौरभ भारद्वाज, अमानुतुल्ला खान, राजेंद्रपाल गौतम आदींचा समावेश आहे. आपच्या ८ पैकी ७ महिला उमेदवार यंदा विजयी झाल्या.