दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:49 IST2025-10-06T12:49:07+5:302025-10-06T12:49:32+5:30
Coldrif सिरपमुळे झालेल्या 16 मुलांच्या मृत्यूंनंतर बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे.

दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
Coldrif Syrup: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात विषारी कफ सिरप (Coldrif) मुळे 14 निरपराध बालकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. तसेच प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांना निलंबित करण्यात आले असून, डॉक्टर आणि औषध निर्माण करणाऱ्या कंपनीविरुद्ध FIR देखील दाखल करण्यात आली आहे. असातच, एफआयआर नोंदवण्यापूर्वी संबंधित डॉक्टराची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मी 38 वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय- डॉ. प्रविण सोनी
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रविण सोनी हे परासिया परिसरात 38 वर्षांपासून रुग्णसेवा करत आहेत. अलिकडील व्हायरल तापाच्या काळात अनेक मुलांचे उपचार त्यांनी केले होते. FIR दाखल होण्याच्या चार दिवस आधी त्यांनी Aajtakशी संवाद साधताना आपली बाजू मांडली होती. 'पावसाळ्यात जीवाणू वेगाने वाढतात. या काळात अनेक मुलांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसू लागली. 104 डिग्रीपर्यंत ताप असलेल्या मुलांवर आम्ही प्राथमिक उपचार केले.'
'ज्यांना गंभीर त्रास होता, त्यांना आम्ही जिल्हा रुग्णालयात किंवा वरिष्ठ डॉक्टरांकडे रेफर करत होतो. मी 38 वर्षांपासून परासिया सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मी हे औषध मागील 10 वर्षांपासून देत आहे. फार्मसीचे फॉर्म्युलेशन हे सर्व फार्मेसी विभाग पाहतो. आम्हा डॉक्टरांना तर सगळी ओषधे रेडीमेड, सीलबंद स्वरुपात मिळतात. जी औषधे आली, तशाच स्वरुपात मुलांना दिली,' अशी प्रतिक्रिया डॉक्टराने दिली.
सरकारची कारवाई
छिंदवाडा जिल्ह्यात कोल्ड्रिफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर या सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. शनिवारी सकाळी आलेल्या तपासणीत नमुने अमान्य आढळले. त्यानंतर त्वरित कारवाई करत कोल्ड्रिफ सिरपच्या विक्रीवर संपूर्ण राज्यभर बंदी घालण्यात आली असून, या औषधाच्या वाहतुकीवरही कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, हे सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकांविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.