हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:12 IST2025-07-18T14:12:13+5:302025-07-18T14:12:36+5:30
सरकारी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी सर्दी, डोकेदुखी किंवा सौम्य ताप अशा तक्रारी घेऊन आलेल्या रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर कॅन्सर, किडनी फेल्यूअर आणि हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांसाठी महागडी औषधे लिहिली असल्याचा आरोप आहे.

हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
राजस्थान सरकारी आरोग्य योजना (RGHS) अंतर्गत रुग्णांच्या आरोग्याशी, जीवाशी खेळ गेला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलवर जिल्ह्यातील लेटेस्ट रिपोर्ट धडकी भरवणारा आहे. सरकारी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी सर्दी, डोकेदुखी किंवा सौम्य ताप अशा तक्रारी घेऊन आलेल्या रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनवर कॅन्सर, किडनी फेल्यूअर आणि हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांसाठी महागडी औषधं लिहिली असल्याचा आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती महिलांना वंध्यत्व दूर करणारी औषधं देखील देण्यात आल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात, सरकारी डॉक्टर, मेडिकल स्टोअर ऑपरेटर आणि लॅब मालक यांच्यात कमिशन गेमचा खोल संबंध असल्याचे पुरावे आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या चौकशीत गडबड झाल्याचं उघड झाल्यानंतर अलवर जिल्ह्यातील ११ डॉक्टर आणि अनेक मेडिकल स्टोअर ऑपरेटरना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राजगड सामुदायिक आरोग्य केंद्राच्या सर्व डॉक्टरांवर कारवाई केली जात आहे.
एका डॉक्टरने सामान्य, निरोगी महिलांच्या प्रिस्क्रिप्शनवर वंध्यत्वाचं औषध लिहिलं, तर सौम्य ताप असलेल्या रुग्णाच्या प्रिस्क्रिप्शनवर कॅन्सर, किडनी आणि हृदयाशी संबंधित औषधं दिली जात होती. मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. योगेंद्र शर्मा यांनी माहिती दिली की, RGHS योजनेत बऱ्याच काळापासून गडबड होत असल्याच्या तक्रारी येत होत्या, त्यानंतर सखोल चौकशी मोहीम राबविण्यात आली. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक तथ्य समोर आली आहेत.
तपासात एक भयंकर गोष्ट देखील समोर आली आहे की अनेक डॉक्टरांनी रुग्णाला न पाहताही प्रिस्क्रिप्शन लिहिलं. काही प्रकरणांमध्ये रुग्णांना न कळवता त्यांच्या नावाने औषधं खरेदी केली गेली आणि त्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये बनावट प्रिस्क्रिप्शन आणि मेडिकल स्टोअर चालकांच्या संगनमताचे ठोस पुरावे समोर आले आहेत. या संशयास्पद नेटवर्कमध्ये शिवाजी पार्क प्राथमिक आरोग्य केंद्र, पहाडगंज प्राथमिक आरोग्य केंद्र आणि राजगड रुग्णालय यासारख्या अनेक सरकारी रुग्णालयांचा सहभाग असल्याचं आढळून आलं आहे.