कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 08:59 IST2025-12-24T08:56:45+5:302025-12-24T08:59:28+5:30
कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम आता ५० हजारांचे इनाम घोषित करण्यात आले असून त्याच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरणार आहे.

कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये 'कोडीन'युक्त कफ सिरपच्या तस्करीने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम जायसवाल अद्याप फरार असून, वाराणसी पोलिसांनी आता त्याच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. शुभमवर असलेल्या २५ हजार रुपयांच्या इनामाची रक्कम वाढवून आता ५० हजार रुपये करण्यात आली आहे. इतकेच नाही तर, त्याच्या अवैध मालमत्तेवर बुलडोझर चालवण्याची आणि संपत्ती जप्त करण्याची तयारीही पोलिसांनी पूर्ण केली आहे.
लुक आऊट नोटीस जारी
वाराणसीचे पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. शुभम जायसवाल आणि त्याचे साथीदार देवेश जायसवाल, अमित जायसवाल आणि आकाश पाठक हे देश सोडून पळून जाऊ नयेत, यासाठी त्यांच्याविरुद्ध 'लुक आऊट' नोटीस जारी करण्यात आली आहे. पोलीस आता या आरोपींच्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या मालमत्तांचीही चौकशी करत आहेत.
फर्जी कागदपत्रांचा आधार
एसआयटी तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुभम जायसवाल आणि भोला प्रसाद यांनी रांची (झारखंड) येथे 'शैली ट्रेडर्स' नावाने परवाना मिळवण्यासाठी चक्क बनावट आधार कार्ड, भाडेकरार आणि अनुभवाचे प्रमाणपत्र सादर केले होते. या फसवणुकीप्रकरणी रांचीमधील धुर्वा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध प्रशासनाची दिशाभूल करून त्यांनी हा परवाना मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बांगलादेश सीमेपर्यंत कनेक्शन!
तपासाची चक्रे फिरल्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे थेट पश्चिम बंगालमधील सिलीगुडी आणि दार्जिलिंगपर्यंत पोहोचले आहेत. बांगलादेशच्या सीमेवर नशिल्या 'न्यू फेन्साडिल' कफ सिरपची मोठी खेप पाठवली जात होती. या संदर्भात एनसीबी सिलीगुडीनेही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेल्या या रॅकेटमुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
कोर्टाकडूनही दणका पोलीस आयुक्तांनी सांगितले की, एसआयटीने सादर केलेले पुरावे इतके भक्कम आहेत की, न्यायालयानेही आरोपींना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. "आता या प्रकरणात 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईल," असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. शुभम जायसवालच्या अवैध कमाईतून उभ्या राहिलेल्या साम्राज्यावर लवकरच बुलडोझर फिरणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत.