पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधीलपाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली. जेणेकरून राजस्थानमध्ये सैन्याच्या गरजा पूर्ण करता येतील.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हवाल्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राजस्थान सरकारने पंजाबच्या कोट्यामधून जास्त पाणी मागितलं आहे, कारण राजस्थान सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे.
सैन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी सोडलं - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न येतो तेव्हा पंजाब कधीही मागे राहत नाही. फक्त पाणीच नाही तर पंजाब राष्ट्रीय हितासाठी आपलं रक्तही सांडू शकतो. सैन्यातील जवानांच्या गरजा लक्षात घेऊन मी राजस्थानला तात्काळ अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
४,५०० क्युसेक अतिरिक्त पाण्याची मागणी
हरियाणा सरकारने उष्णतेमुळे ४,५०० क्युसेक अतिरिक्त पाण्याची मागणी केली होती. यावर पंजाब सरकारने म्हटलं होतं की, हरियाणाने आधीच आपल्या कोट्याचं पाणी घेतलं आहे. पंजाब सरकारने हरियाणाला एक थेंबही अतिरिक्त पाणी देण्यास नकार दिला होता.
हा वाद इतका गंभीर झाला की, भाखरा नांगल येथे पंजाब पोलिसांना तैनात करण्यात आले. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर काही दिवसांपूर्वी भाखरा नांगल बोर्डाची बैठक झाली. पंजाब सरकारच्या अनिच्छेला न जुमानता बोर्ड बैठकीत हरियाणाला ४५०० क्युसेक अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.