किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 05:35 IST2025-08-15T05:35:27+5:302025-08-15T05:35:53+5:30

बेपत्ता झालेल्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती

Cloudburst in Kishtwar while langar was being served 46 people died 120 rescued | किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले

किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात अत्यंत दुर्गम भागांत वसलेल्या गावात गुरुवारी झालेल्या भयंकर ढगफुटीने ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात 'सीआयएसएफ'च्या दोन जवानांचा समावेश आहे. या ढगफुटीमुळे आलेल्या पुरातील गाळात अनेकजण दबले असल्याची भीती असून १२० जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले. ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिचैल माता मंदिर मार्गावर शेवटचे गाव असलेल्या चोसिती येथे दुपारी १२ ते १च्या दरम्यान मंदिरातील वार्षिक यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविक जमले होते. सुमारे ९,५०० फूट उंचीवर असलेले हे मंदिर किश्तवाडपासून ९० कि.मी.वर आहे. येथे लंगर सुरू असताना अचानक ढगफुटी झाली आणि अचानक आलेल्या महापुरात अनेक दुकाने, बांधकामे तसेच सुरक्षा चौकी वाहून गेली.

या आपत्तीनंतर राष्ट्रीय व राज्य आपत्ती निवारण पथकांसह पोलिस तसेच स्थानिकांनी मदत-बचावकार्य सुरू केले. बेपत्ता झालेल्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती-पंतप्रधानांना दुःख 

जम्मू-काश्मीरमधील या ढगफुटीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या भागात सर्वतोपरी मदत पोहोचवली जाईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.

लष्कराचे जवान बचावकार्यासाठी दाखल

मदत व बचावकार्यात लष्कराचे जवान सहभागी झाले असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. लष्करी जवानांसह वैद्यकीय पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून तत्काळ मदत उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.
 

Web Title: Cloudburst in Kishtwar while langar was being served 46 people died 120 rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.