क्रिकेट सामन्यादरम्यान, तुफान राडा; गोळीबार, दगडफेकीत आठ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:27 IST2025-03-21T17:26:54+5:302025-03-21T17:27:03+5:30
Uttar Pradesh Crime News: क्रिकेट सामन्यादरम्यान, झालेल्या किरकोळ वादाचं पर्यावसान हाणामारीत होऊन दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे घडली आहे.

क्रिकेट सामन्यादरम्यान, तुफान राडा; गोळीबार, दगडफेकीत आठ जण जखमी
क्रिकेट सामन्यादरम्यान, झालेल्या किरकोळ वादाचं पर्यावसान हाणामारीत होऊन दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे घडली आहे. या घटनेता दोन महिलांसह आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अलीगडमधील सासनी गेट पोलील ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काजीपाडा परिसरामध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान अनस आणि मोहसिन या शेजाऱ्यांमध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी परिसरातील जाणत्या मंडळींनी मध्यस्ती करून हा वाद सोडवला होता. मात्र गुरुवारी रात्री पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आणि त्याचं पर्यावसान हाणामारीमध्ये झालं.
पोलीस अधीक्षक (शहर) एम. शेखर पाठक यांनी सांगितलं की, क्रिकेट सामन्यादरम्यान झालेला हा वाद लवकरच हाणामारीपर्यंत पोहोचला. तसेच त्यात काही लोक जखमी झाले. यातील काही जण चाकू हल्ल्यामध्ये जखमी झाले. तर काही जण गोळीबारात जखमी झाले. यादरम्यान, काही घरांवरून दगडफेकही करण्यात आली. या वादामध्ये दोन महिलांसह आठ जण जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील पाच जणांना डोक्याला जखम झाल्याने पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले.