भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:25 IST2025-07-23T18:19:45+5:302025-07-23T18:25:10+5:30
भारत नेपाळ सीमेवर जमावाच्या हल्ल्यानंतर गोळीबार झाला असून यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.

भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
Attack on Indo Nepal Border: बिहारच्या मधुबनी येथे बुधवारी सकाळी भारत-नेपाळ सीमेवर एक मोठी घटना घडली. बसोपट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिनतपूर गावात असलेल्या सीमा सुरक्षा बलाच्या चेकपोस्टवरुन चार संशयास्पद तरुण कच्च्या रस्त्याने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. चौकीवर तैनात असलेल्या एसएसबी जवानांनी त्यांना थांबवले आणि त्यांना मुख्य रस्त्याने जाण्याचा सल्ला दिला. यावर संशयित संतप्त झाले आणि काही वेळातच तेथे जमाव जमला. जमावाने जवानांशी झटापट केली आणि चेकपोस्टवर दगडफेक केली. हल्लेखोरांनी जवानांकडून शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्नही केला. याच प्रयत्नात गोळीबार झाला. या गोळीबारात एक जवान आणि हल्लेखोर जखमी झाला आहे.
बुधवारी सकाळी भारत नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांसोबत हा सगळा प्रकार घडला. काही हल्लेखोरांनी एसएसबी चेकपोस्टवर हल्ला केला आणि जमावाने जवानाचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्नही केला. यादरम्यान एसएसबी जवानाने स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. या गोळीबारात एका जवानाच्या डोक्याला आणि दुसऱ्याच्या हाताला दुखापत झाली. त्याच वेळी एका हल्लेखोराच्या कंबरेला गोळी लागली. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व हल्लेखोरांची ओळख पटवली असून एका व्यक्तीला अटकही केली आहे.
हेड कॉन्स्टेबल सुधीर कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली सीमेवर कॉन्स्टेबल राज गोंड, राजू कुमार राम आणि सरोज कुमार यादव हे ड्युटीवर होते. तेव्हा चार संशयास्पद तरुण कच्च्या रस्त्याने नेपाळ सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. जवानांनी त्यांना थांबवले आणि मुख्य रस्त्यावरून जाण्याचा सल्ला दिला. पण ते तरुण आक्रमक झाले. त्यानंतर तिथे मोठा जमाव जमला आणि त्यांनी एसएसबी जवानांवर हल्ला केला. जमावाने फक्त जवानांना मारहाणच केली नाही तर चेकपोस्टवर दगडफेक केली आणि जवानांची शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून कॉन्स्टेबल राजू कुमार राम यांनी स्वसंरक्षणार्थ त्यांच्या इन्सास रायफलमधून पाच राउंड फायर केले. यादरम्यान भरत पासवान यांना गोळी लागली.
पोलिसांनी काय सांगितले?
"सकाळी १०:०० वाजता, नेपाळ सीमेजवळील एसएसबी चेकपोस्टवर, चेकपोस्ट रस्त्याऐवजी लगतच्या कच्च्या रस्त्याने ४ जण आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. २ एसएसबी जवान तिथे होते. त्यांनी त्यांना थांबवले तेव्हा या लोकांनी एसएसबी जवानांशी झटापट सुरू केली. एसएसबी जवानाने स्वसंरक्षणार्थ हवेत राउंड गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. एका एसएसबी जवानाच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तर दुसऱ्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. एका हल्लेखोराला कमरेजवळ गोळी लागली आहे आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. परिस्थिती सामान्य आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही. सीसीटीव्हीद्वारे सर्व हल्लेखोरांची ओळख पटवण्यात आली आहे. बसोपट्टी पोलिसांनी एकाला अटक केली आहे," अशी माहिती मधुबनी पोलिसांनी दिली.