CJI BR Gavai : भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचे पालन न केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पण, आता त्यांनी स्वतः हा मुद्दा इथेच थांबवण्याचे आवाहन केले आहे. 'क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्त्व देऊ नका. याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला, आता हे प्रकरण बंद करा,' असे त्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये ही माहिती देण्यात आली.
काय आहे प्रोटोकॉल वाद?महाराष्ट्राचे रहिवासी असलेले न्यायमूर्ती गवई रविवारी(दि. 18) एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांसह राज्याचे प्रमुख अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. प्रोटोकॉलचे पालन न करण्याच्या मुद्द्यावर माध्यमांमध्येही जोरदार चर्चा होऊ लागली.
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीदेखील सरन्यायाधीश गवई यांच्या विचारांचे समर्थन केले आणि प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या फोटोंजवळ उपराष्ट्रपतींचा फोटो नसतो, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
सरन्यायाधीश गवई काय म्हणाले?वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल सरन्यायाधीश गवई यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले, 'जेव्हा एखाद्या संवैधानिक संस्थेचे प्रमुख पहिल्यांदाच एखाद्या राज्याला भेट देतात, तेव्हा त्यांचे स्वागत कसे करायचे, याचा विचार केला पाहिजे. या गोष्टी क्षुल्लक वाटू शकतात, पण त्याचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. न्यायपालिका, कार्यकारी आणि कायदेमंडळ हे संविधानाचे समान अंग आहेत. प्रत्येकाने एकमेकांना योग्य आदर दाखवणे महत्वाचे आहे,' असे गवई म्हणाले होते.