Citizenship Amendment Bill 2 Died while Protesting in assam internet service suspended in meghalaya | Citizenship Amendment Bill: ईशान्य भारत पेटला! आसाममध्ये २ आंदोलकांचा मृत्यू; मेघालयात इंटरनेट ठप्प

Citizenship Amendment Bill: ईशान्य भारत पेटला! आसाममध्ये २ आंदोलकांचा मृत्यू; मेघालयात इंटरनेट ठप्प

गुवाहाटी/शिलाँग: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होताच ईशान्य भारताच्या बहुतांश भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आसामची राजधानी गुवाहाटीत विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिकांच्या अधिकारांना कोणताही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत राज्यातील जनतेला संबोधित केलं. नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे स्थानिकांच्या परंपरा, संस्कृती, भाषा आणि जमिनीच्या अधिकारांना धक्का लागणार नाही. त्यामुळे स्थानिकांनी चिंता करू नये. आसाम कराराच्या ६ व्या कलमांतर्गत स्थानिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यात येईल, असा विश्वास सोनोवाल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला दिला. 

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होताच ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये आंदोलनं सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर मेघालयातील इंटरनेट आणि मेसेजिंग सेवा खंडित करण्यात आल्या आहेत. पुढील ४८ तासांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. पीटीआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

ईशान्य भारताच्या अनेक भागांमधील इंटरनेट आणि मेसेजिंग सेवा बंद करण्यात आल्या आहेत. गुवाहाटी पाठोपाठ मेघालयाची राजधानी शिलाँगमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मेघालयातील परिस्थिती अतिशय गंभीर स्वरुप धारण करत असल्यानं मुख्यमंत्री कोनराड संगमा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. संगमा यांनी आधीपासूनच नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Citizenship Amendment Bill 2 Died while Protesting in assam internet service suspended in meghalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.