भारताच्या भूमीवर घुसले चिनी रणगाडे…, गंभीर आरोप करताना राहुल गांधींनी हवाला दिलेलं पुस्तक कोणतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:01 IST2026-02-02T15:00:44+5:302026-02-02T15:01:04+5:30
Rahul Gandhi News: लोकसभेमध्ये आज राष्ट्रपतींनी दिलेल्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, राहुल गांधी यांनी एका अप्रकाशित पुस्तकामधील उल्लेखांचा हवाला देत भारताच्या भूमीवर चिनी टँक घुसले होते, असा दावा केल्याने मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला.

भारताच्या भूमीवर घुसले चिनी रणगाडे…, गंभीर आरोप करताना राहुल गांधींनी हवाला दिलेलं पुस्तक कोणतं?
लोकसभेमध्ये आज राष्ट्रपतींनी दिलेल्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या सनसनाटी दाव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला. एका अप्रकाशित पुस्तकामधील उल्लेखांचा हवाला देत राहुल गांधी यांनी भारताच्या भूमीवर चिनी टँक घुसले होते, असा दावा केला. राहुल गांधी यांनी केलेल्या या दाव्यांना सत्ताधारी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांनी या दाव्यांवर आक्षेप घेत ते फेटाळून लावले. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांनी संदर्भासाठी वापरलेलं पुस्तकही चर्चेत आलं आहे. तसेच हे पुस्तक कोणतं अशी विचारणा होत आहे.
लोकसभेमध्ये केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागताना राहुल गांधी यांनी ज्या अप्रकाशित पुस्तकामधील मजकुराचा संदर्भ दिला, ते पुस्तक माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं नाव फोर स्टार्ट ऑफ डेस्टिनी असं आहे. या पुस्तकामध्ये अनेक घडामोडींचा उल्लेख आहे. तसेच २०२० साली चीनसोबत लडाख आणि गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षाचाही त्यात उल्लेख करण्यात आला आहे.
या पुस्तकाबाबत समोर येत असलेल्या माहितीनुसार त्यात लष्कर आणि सरकारमधील उच्चस्तरावरून घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांबाबत अनेक दावे करण्यात आलेले आहेत. मात्र हे पुस्तक अद्याप प्रदर्शित झालेलं नाही. संरक्षण मंत्रालयाकडून या पुस्तकाचं परीक्षण करण्यात येत आहे. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यापुर्वी अवलंबण्यात येणारी ही नियमित प्रक्रिया आहे. तसेच अशा पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी त्याचं संरक्षण मंत्रालयाकडून परीक्षण आणि मान्यता आवश्यक असतं. हे पुस्तक खूप आधीच प्रकाशित होणार होतं. मात्र अंतिम मान्यता न मिळाल्याने ते अद्याप प्रकाशित होऊ शकलेलं नाही.