सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 08:13 IST2025-08-17T08:13:18+5:302025-08-17T08:13:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर या महिन्याच्या अखेरीस जाणार आहेत.

सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी सोमवार १८ ऑगस्टला भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी भारत व चीनमधील सीमाप्रश्नावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमधील चर्चेची २४वी फेरी होईल. त्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत वांग यी बोलणी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक परिषदेसाठी चीनच्या दौऱ्यावर या महिन्याच्या अखेरीस जाणार आहेत. त्याआधी ही घडामोड होत आहे.
भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निमंत्रणावरून, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही वांग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. डोवाल यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चीनला भेट दिली होती आणि तेव्हा वांग यांच्यासोबत विशेष प्रतिनिधींची २३वी फेरी पार पडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात रशियातील कझान शहरात दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी एक बैठक झाली. दोन्ही देशांतील संवाद पुन्हा सुरू करण्याचा निर्णय त्या बैठकीत झाला.
मोदी जपाननंतर चीनला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २९ ऑगस्टला जपान दौऱ्यावर जाणार असून, त्यानंतर ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनमधील तिआनजिन शहरात होणाऱ्या एससीओ परिषदेला उपस्थित राहतील. २ जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पूर्व लडाखमधील लष्करी संघर्ष मे २०२० मध्ये सुरू झाला आणि गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये डेमचोक आणि डेपसांगमधून सैन्य माघारीच्या प्रक्रियेनंतर तो थांबला. दोन्ही देशांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शविली.
भारत आणि चीनमध्ये थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या शक्यतांवरही चर्चा सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीही मागील दोन महिन्यांत एससीओ बैठकीसाठी चीनला भेट दिली. सध्या चीन एससीओचा अध्यक्ष आहे.
चीनने पाकिस्तानला दिली पाणबुडी
चीनने पाकिस्तानला तिसरी प्रगत हँगोर वर्गातील पाणबुडी दिली आहे. अशा आठ पाणबुड्या पाकिस्तानला मिळणार आहेत. हिंद महासागरात पाकिस्तानचेही वर्चस्व निर्माण होण्यासाठी हा निर्णय चीनने घेतल्याचे कळते. सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, या पाणबुडीचे गुरुवारी चीनच्या वुहान शहरात जलावतरण करण्यात आले. चीनने पाकिस्तानला हँगोरवर्गातील दुसरी पाणबुडी गेल्या मार्च महिन्यात दिली होती.