अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरुद्ध चिनी कंपन्यांचा २.१ अब्ज डॉलरचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:52 IST2019-06-19T03:21:56+5:302019-06-19T06:52:44+5:30
दिवाळखोरीचा खटला; सात संस्थांची कर्जे थकवली

अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरुद्ध चिनी कंपन्यांचा २.१ अब्ज डॉलरचा दावा
नवी दिल्ली : अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनीकडे चीनच्या बँकांनी २.१ अब्ज डॉलरच्या कर्जाच्या वसुलीची मागणी केली आहे. आरकॉम ही कंपनी या महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळखोरीत निघाली असून, कंपनीविरुद्ध दिवाळखोरी न्यायालयात कर्जदाता संस्थांनी दावे दाखल केले आहेत.
कर्ज वसुलीचा दावा करणाऱ्या चिनी बँकांत चायना डेव्हलपमेंट बँक, इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना आणि एक्झिम बँक ऑफ चायना यांचा समावेश आहे. चीन सरकारच्या मालकीची चायना डेव्हलपमेंट बँक यातील सर्वांत मोठी कर्जदाता बँक आहे. या बँकेचे आरकॉमकडे ९,८६० कोटी रुपये (१.४ अब्ज डॉलर) थकले आहेत. एक्झिम बँक ऑफ चायनाने ३,३६० कोटी, तर इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाने १,५५४ कोटी रुपये कंपनीकडे मागितले आहेत. आरकॉमने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.
आरकॉम कंपनीविरुद्ध दिवाळखोरी न्यायालयात खटला सुरू आहे. आपल्या मालमत्ता विकून कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहेत. अनिल अंबानी यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने आरकॉमच्या मालमत्ता १७,३०० कोटी रुपयांना विकत घेण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि, नियामकीय अडथळ्यांमुळे हा व्यवहार होऊ शकला नाही.
रिलायन्स कम्युनिकेशनकडे देश-विदेशातील प्रमुख सात संस्थांचे कर्ज थकले असून, त्यातील एक चतुर्थांश कर्ज चिनी बँकांचे आहे. दिवाळखोरी न्यायालयात आरकॉमविरुद्ध तब्बल ५७,३८२ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कर्जदात्यांनी दावे दाखल केले आहेत.
आधी टळली होती अटक
एरिक्सन एबीने आरकॉमविरुद्ध दाखल केलेल्या ८० दशलक्ष डॉलरच्या खटल्यात अनिल अंबानी यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली होती. मुकेश अंबानी यांनी ही रक्कम दिल्याने अनिल अंबानी यांची जेलवारी टळली.