काश्मीरमध्ये विनापरवाना फिरताना सापडला चिनी नागरिक, फोनमधून समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:39 IST2025-12-08T12:39:28+5:302025-12-08T12:39:47+5:30
Chinese National Caught In Kashmir: काश्मीरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लष्कराच्या गुप्तचर विभागाने इंटरनेटवर एक संशयास्पद संभाषण इंटरसेप्ट केल्यानंतर एका चिनी नागरिकाला ताब्यात घेतले आहे.

काश्मीरमध्ये विनापरवाना फिरताना सापडला चिनी नागरिक, फोनमधून समोर आली धक्कादायक माहिती
काश्मीरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लष्कराच्या गुप्तचर विभागाने इंटरनेटवर एक संशयास्पद संभाषण इंटरसेप्ट केल्यानंतर एका चिनी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. हा चिनी नागरिक बेकायदेशीररीत्या लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये घुसला होता. २९ वर्षीय चिनी नागरिक हू कोंगताई याला सध्या काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या परवानगीशिवाय प्रवास आणि व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. त्याला श्रीनगरजवळ बडगाम जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठामधून फिजिक्समधून पदवी घेतलेल्या हू याच्या पासपोर्टमधून त्याने अमेरिका, न्यूझीलंड, ब्राझील, फिजी आणि हाँगकाँग या देशांमध्ये प्रवास केल्याचे दिसून येत आहे. हू हा १९ नोव्हेंबर रोजी टुरिस्ट व्हिसावर नवी दिल्ली येथे आला होता. हा व्हिसा ३० डिसेंबर २०२५ पर्यंत वैध होता. त्याला या व्हिसामधून वाराणसी, सारनाथ, गया, कुशीनगर, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्ली या काही मोजक्या शहरांमध्ये फिरण्याची परवानगी होती. मात्र तो २० नोव्हेंबर रोजी विमानतळावरील फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसमधील काऊंटरवर आवश्यक नोंदणी न करताच लेह येथे गेला होता. लडाख आणि जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील परिसरात जाण्यासाठी परदेशी नागरिकांना विशेष परवानगी घ्यावी लागते. हा चिनी नागरिक श्रीनगरमधील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबला. तसेच त्याने बाजारामधून एक भारतीय सिमकार्ड विकत घेतले. ही बाब परदेशी पर्यटकांसाठी बनवण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन होती.
त्यानंतर लष्कराकडून इंटरसेप्ट करण्यात आलेल्या इंटरनेटवरील संभाषणानंतर सुरक्षा एजन्सींना अलर्ट करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यन, त्याच्या मोबाईल फोनच्या तपासामधून सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवणारी सर्च हिस्ट्री समोर आली आहे.
त्याने काश्मीर खोऱ्यातील सीआरपीएफच्या तैनातीबाबत, कलम ३७० बाबत संबंधित माहितीचा शोध घेतला होता. तसेच त्याने काही संवेदनशील भागांचा दौराही केला होता. हू कोंगताई हा सध्या बडगाम जिल्ह्यातील हुमहामा पोलीस चौकीत असून, त्याची कससून चौकशी केली जात आहे. कोंगताई याने व्हिसा नियमांचं उल्लंघन केलं असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला चीनमध्ये डिपोर्ट केलं जाईल.