चीनच्या आक्रमक पवित्र्याने सीमेवर तणातणी, हाणामारी, सिक्कीम व लडाखमधील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:22 AM2020-05-11T05:22:54+5:302020-05-11T05:23:34+5:30

स्थानिक पातळीवर चर्चेनंतर आता परिस्थिती निवळली असली तरी अजूनही तेथे दोन्ही बाजूचे सैनिक समोरासमोर आहेत.

China's aggressive sanctity has led to border tensions, clashes, incidents in Sikkim and Ladakh | चीनच्या आक्रमक पवित्र्याने सीमेवर तणातणी, हाणामारी, सिक्कीम व लडाखमधील घटना  

चीनच्या आक्रमक पवित्र्याने सीमेवर तणातणी, हाणामारी, सिक्कीम व लडाखमधील घटना  

Next

नवी दिल्ली : चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) व भारतीय लष्कर यांच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांमध्ये शनिवारी सिक्कीममध्ये व रविवारी दुपारी लडाखमध्ये तणातणी व शारीरिक हाणामारीच्या दोन घटना घडल्या. त्यात दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली. मात्र स्थानिक पातळीवर चर्चा करून समजूत घातल्यावर परिस्थिती निवळली, असे लष्करातील सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी सांगितले की, पहिली घटना शनिवारी माध्यान्हीच्या सुमारास उत्तर सिक्किममध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील मुगुतांगच्या जवळ असलेल्या १९ हजार फूट उंचीवरील नाकू ला खिंडीजवळ घडली. तिबेटी भाषेत मुगुतांग याचा अर्थ मोकळी जागा असा होतो. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सीमारेषा बºयापैकी आखलेली आहे. तरीही चीनचे सैनिक तेथे येऊन अधून-मधून आक्रमक पवित्रा घेत असतात. शनिवारीही यावरूनच दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये बाचाबाची व तणातणी झाली.

सूत्रांनी असेही सांगितले की, लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारताच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ रविवारी दुपारी दुसरी घटना घडली. येथे चीनचे सैनिक भारतीय सैनिकांच्या अंगावर धावून आल्याने दोघांमध्ये झटापट व धक्काबुक्की झाली.
स्थानिक पातळीवर चर्चेनंतर आता परिस्थिती निवळली असली तरी अजूनही तेथे दोन्ही बाजूचे सैनिक समोरासमोर आहेत. लष्करी मुख्यालयातील सूत्रांनी याला दुजोरा देताना सांगितले की, प्रत्यक्ष सीमारेषा अनेक ठिकाणी स्पष्टपणे आखलेली नसल्याने दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये अशा घटना क्वचितप्रसंगी घडत असतात. ठरलेल्या प्रक्रियेनुसार स्थानिक पातळीवर चर्चा होऊन समजूत घातल्यानंतर असा तात्कालिक वाद सोडविला जातो.

माहितगार सूत्रांच्या म्हणण्यानुसार एप्रिलच्या अखेरपासून ‘पीएलए’ने आक्रमक पवित्रा घेतल्याने या ताज्या घटनांना सुरुवात झाली आहे. २७ एप्रिल रोजी चिनी सैन्याचे एक वाहन भारताच्या हद्दीत आले होते. भारतीय सैनिकांनी हटकल्यावर ते परत माघारी गेले होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लडाकमधील पॅनगाँग त्से सरोवराच्या उत्तर किनाºयावर तसेच चुमार व यांगत्से भागातही अशाच घटना घडल्या होत्या. त्याआधी जून २०१७ मध्ये सिक्किमजवळच्या डोकलाम पठारावर दोन्ही सैन्यांमध्ये ७३ दिवसांचा वाद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांच्यात वुहान येथे पहिली अनौपचारिक शिखर बैठक झाल्यानंतर त्या वादावर पडदा पडला होता.

लिपुलेख भागावरून भारत, नेपाळमध्ये पेटला सीमा प्रश्न

च्नवी दिल्ली : सीमेवरील लिपुलेख हा भाग नेमका कोणाच्या हद्दीत आहे यावरून भारत व नेपाळमध्ये वादंग माजले आहे. लिपुलेख हे आमच्या हद्दीत असूनही भारताने तिथपर्यंत रस्ता बांधण्याची आगळीक केली आहे, असा आरोप नेपाळने केला आहे. त्या देशाने आपली नाराजी भारतीय राजदूताकडे व्यक्त केली, तर लिपुलेख हा नेपाळचा भाग नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
च्या रस्त्याचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते झाले होते. कैलास मानसरोवर यात्रेसाठी भाविक याच रस्त्याचा वापर करतात. भाविक, स्थानिक लोक , व्यापारी यांना सुलभतेने प्रवास करता यावा म्हणून लिपुलेख भागापर्यंत रस्ता बांधण्यात आला, असे भारताने म्हटले आहे.

च्नेपाळच्या परराष्ट्र विभागाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या देशाच्या हद्दीमध्ये भारताने ढवळाढवळ करू नये.
च्लिपुलेख प्रकरणाबाबत नेपाळचे परराष्ट्र सचिव शंकरदास बैरागी यांनी भारताचे नेपाळमधील राजदूत विनय क्वात्रा यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

लिपुलेखप्रकरणी भारताकडे कडक शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना साथीची समस्या संपल्यानंतर लिपुलेखच्या प्रश्नाबद्दल भारत व नेपाळमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चा करण्यात येईल, असे भारताने म्हटले आहे. भारताच्या नकाशामध्ये लिपुलेख, कालापानी, लिम्पियाधुरा हे त्या देशाचा भाग असल्याचे दाखविण्यात आले आहे, असा आक्षेप नेपाळने नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतला होता.
-प्रदीप ग्यावली, नेपाळचे परराष्ट्रमंत्री

१८१६ साली झालेल्या सुगौली करारानुसार काली नदीच्या पूर्व बाजूला असलेले लिम्पियाधुरा, कालापानी, लिपुलेख हे सारे भाग नेपाळच्या हद्दीत येतात. ही गोष्ट नेपाळ सरकारने गेल्या काही वर्षांत अनेकदा भारताच्या कानावर घातली आहे. दोन देशांच्या चर्चेदरम्यानही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, असे नेपाळने म्हटले आहे.

 

Web Title: China's aggressive sanctity has led to border tensions, clashes, incidents in Sikkim and Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.