'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 13:42 IST2025-11-22T13:00:56+5:302025-11-22T13:42:59+5:30
चीनने बनावट सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर करून एआय आणि व्हिडीओ गेमच्या फोटोंचा प्रचार केला. यामध्ये चिनी शस्त्रांनी नष्ट केलेल्या विमानांचे कथित अवशेष दाखवले.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाचा चीनने संधीसाधूपणे फायदा घेतला आणि पाकिस्तानला त्यांच्या संरक्षण क्षमतांची चाचणी घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरवल्याचा दावा दोन सदस्यीय अमेरिकन आयोगाने त्यांच्या वार्षिक अहवालात केला आहे. अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा पुनरावलोकन आयोगाचा अहवाल मंगळवारी प्रकाशित झाला आहे. बीजिंगने चार दिवसांच्या संघर्षाचा फायदा घेऊन त्यांच्या शस्त्रांची चाचणी घेतली आणि त्यांची जाहिरात केली, असं या अहवालात म्हटले आहे.
"या संघर्षात चीनने पहिल्यांदाच त्यांच्या आधुनिक शस्त्र प्रणालींचा वापर केला, यामध्ये HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली, PL-15 हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि J-10 लढाऊ विमाने यांचा समावेश होता. हे प्रत्यक्ष जगाच्या फील्ड प्रयोगासारखे काम करत होते, असंही या अहवालात म्हटले आहे.
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ
संघर्षानंतर जूनमध्ये चीनने पाकिस्तानला 40 J-35 पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने, KJ-500 विमाने आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकण्याची ऑफर दिली होती. संघर्षानंतर काही आठवड्यांनंतर, शस्त्रास्त्र विक्री वाढवण्याच्या उद्देशाने चीनच्या दूतावासांनीही भारत-पाकिस्तान संघर्षात त्यांच्या प्रणालींच्या यशाचे कौतुक केले.
राफेलला बदनाम करण्यासाठी मोहीम
भारत-पाकिस्तान संघर्षानंतर चीनने फ्रेंच राफेल लढाऊ विमानांना बदनाम करण्यासाठी प्रचार मोहीम सुरू केल्याचे अहवालात म्हटले आहे. फ्रेंच गुप्तचर यंत्रणेनुसार, चीनने त्यांच्या J-35 च्या बाजूने फ्रेंच राफेलची विक्री रोखण्यासाठी प्रचार मोहीम सुरू केली.
चीनने बनावट सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर करून चिनी शस्त्रांनी नष्ट केलेल्या विमानांचे कथित अवशेष दाखवणारे एआय आणि व्हिडीओ गेम फोटो प्रसारित केले. चिनी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी इंडोनेशियाला राफेल विमानांची आधीच सुरू असलेली खरेदी थांबवण्यास राजी केले.
चीनने अहवाल खोटा असल्याचे म्हटले
चीनने हा अहवाल खोटा असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले, "समितीने जारी केलेला अहवाल खोटा आहे." माओ म्हणाले, "तुम्ही ज्या समितीचा उल्लेख केला आहे ती नेहमीच चीनविरुद्ध वैचारिक पक्षपाती राहिली आहे आणि तिची कोणतीही विश्वासार्हता नाही."
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. भारताने या हल्ल्याशी सीमापार संबंध असल्याचे शोधून काढले आणि ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले, यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला.