अॅप्सवरील बंदीनं मेटाकुटीला आलेल्या चीनने घेतले आक्षेप; भारताकडून जबरदस्त उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 20:44 IST2020-07-13T20:37:43+5:302020-07-13T20:44:40+5:30
लडाखमधील तणाव वाढला असताना भारतानं चीनच्या ५९ अॅप बंदीवर घातली

अॅप्सवरील बंदीनं मेटाकुटीला आलेल्या चीनने घेतले आक्षेप; भारताकडून जबरदस्त उत्तर
नवी दिल्ली: लडाखमधील तणाव वाढल्यानंतर भारतानं चीनला आर्थिक झटका देण्यासाठी ५९ अॅप्सवर बंदी घातली. यामुळे चीनला मोठा धक्का बसला असून प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. भारतानं सर्व आघाड्यांवर चीनला धक्के दिल्यानंतर अखेर चीननं गलवान खोऱ्यातून माघार घेतली. मात्र भारतानं दिलेल्या धक्क्यानं चीन मेटाकुटीला आला आहे.
आज भारत आणि चीनमध्ये राजदूत स्तरावर चर्चा झाली. त्यामध्ये चीननं अॅप्सवरील बंदीबद्दल आक्षेप नोंदवला. मात्र भारतानं ही कारवाई सुरक्षेच्या कारणांवरून केल्याचं स्पष्ट केलं. आमच्या नागरिकांच्या तपशीलाशी छेडछाड होऊ नये, यासाठी पाऊल उचलण्यात आल्याचं भारताकडून चीनला सांगण्यात आलं. मोदी सरकारनं गेल्याच महिन्यात ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याची कारवाई केली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊजर आणि शेअर इटसारख्या अॅप्सचा समावेश आहे.
आज झालेल्या बैठकीत चिनी राजदूतांनी अॅप्सवरील बंदीचा मुद्दा उपस्थित केला. अॅप्सवरील बंदी ते चिनी असल्यानं घातलेले नसून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्यानं घातले आहेत, असं उत्तर भारताकडून चीनला देण्यात आलं. भारताकडून अॅप्सच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानं ते गुगल स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवण्यात आले.
चिनी अॅप्समुळे धोका का असतो?
चिनी अॅप्समुळे सर्वात धोका प्रायव्हसीला असतो. तुम्ही काय टाईप करता, तुम्ही काय बोलता, ही सगळी माहिती चिनी अॅप्स साठवतात. याशिवाय चिनी अॅप्समुळे सुरक्षेलाही धोका असतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींच्या मोबाईलमध्ये चिनी अॅप्स असल्यास देशाची गोपनीय माहिती शत्रूच्या हाती लागू शकते. भारतीय तरुणाई मोठ्या प्रमाणात चिनी अॅप्सचा वापर करते. त्यामुळे कंपन्यांना मोठं उत्पन्न मिळतं.