Maharashtra News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या कुटुंबासह प्रयागराजमध्ये आयोजित पवित्र महाकुंभात स्नान केले. यावेळी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा सोबत होत्या. स्नानानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाकुंभातील व्यवस्थेबद्दल योगी सरकारचे कौतुक केले. तसेच, या महाकुंभात आल्याचा खूप आनंद असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 144 वर्षांनंतर हा महाकुंभाचा योग आला. मी माझ्या कुटुंबासह महाकुंभला येऊ शकलो, याचा मला खूप आनंद आहे. लोक आनंदी आहेत. कोट्यवधी भाविकांनी गंगेत डुबकी मारून नवा इतिहास आणि विक्रम रचला. मी यूपी सरकार आणि सीएम योगी यांचे अभिनंदन करतो. त्यांनी अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे, अशी प्रतक्रिया फडणवीसांनी दिली. तसेच, त्यांनी 2027 साली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभाची तयारी सुरू केल्याचेही सांगितले.
यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, 'मला इथे येऊन खूप छान वाटले. हा एक आनंद देणारा अनोखा अनुभव आहे. पुढील कुंभ नाशिक येथे होणार आहे, त्यासाठी खूप उत्साही आहे. लोक विश्वासाने येतात, त्यामुळे त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था असायला हवी. आम्ही त्यांना एक सुंदर अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
महाकुंभात ‘महारेकॉर्ड’प्रयागराजच्या भूमीत 13 जानेवारीपासून महाकुंभ 2025 सुरू झाला. आत्तापर्यंत 50 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून इतिहास रचला आहे. जगात फक्त भारत आणि चीनची लोकसंख्या येथे येणाऱ्या भाविकांपेक्षा जास्त आहे. मौनी अमावस्येला सर्वाधिक 8 कोटी भाविकांनी स्नान केले, तर मकर संक्रांतीच्या दिवशी 3.5 कोटी भाविकांनी अमृत स्नान केले. महाकुंभ आणि महत्त्वाच्या स्नान महोत्सवाला अजून 12 दिवस बाकी आहेत. त्यामुळे स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या 55 ते 60 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.