जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:51 IST2025-08-01T11:50:55+5:302025-08-01T11:51:48+5:30
चिकन पार्टी कुटुंबाच्या जीवावर बेतली.

जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
छत्तीसगडमधील एका कुटुंबासाठी चिकन पार्टी करणे जीवावर बेतले. एका महिलेने आपल्या जावयासाठी खास चिकन पार्टीचे आयोजन केले होते. मात्र, कुटुंबाने चिकन खाल्ल्याबरोबर सर्वांची प्रकृती बिघडू लागली. उलट्या आणि जुलाबामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, सासू आणि जावयाचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर तीन सदस्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राजगमार पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोरकोमा गावातील आहे. मुलगी लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आल्यामुळे राजमीनबाई नावाच्या महिलेने आपला जावई देव सिंह याच्यासाटी खास चिकन आणि दारुचा बेत आखला होता. कुटुंबातील सर्वांनी चिकनवर ताव मारला, पण ही पार्टी सर्वांसाठी जीवघेणी ठरली. या सर्वांना अन्नातून विषबाधा झाली. जुलाब आणि उलट्या झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सासू आणि जावयाचा मृत्यू झाला, तर उर्वरित लोकांची प्रकृती गंभीर आहे.
रस्त्यावरील अन्नामुळे ३ डझन लोक आजारी
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एका गाडीवर विकला जाणारा चाट खाल्ल्याने ३ डझनहून अधिक लोक आजारी पडले होते. उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारीवरून नजीबाबाद सामीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आजारींना दाखल करण्यात आले. काही मुलांची प्रकृती आणखी बिघडल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले.