नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, आईसह 2 डीआरजी जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 21:58 IST2024-01-01T21:57:47+5:302024-01-01T21:58:40+5:30
घटनेची माहिती मिळताच एसएसपी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, आईसह 2 डीआरजी जवान जखमी
विजापूर: छत्तीसगडच्या विजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली, या चकमकीत एका सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत मुलीच्या आईलाही हाताला गोळी लागली. याशिवाय दोन डीआरजी जवानही चकमकीत गोळ्या लागल्याने जखमी झाले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, सोमवारी छत्तीसगडपोलिसांच्या डीआरजी जवानांना विजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली. माहिती मिळताच डीआरजी जवानांचा एक गट शोध मोहिमेसाठी निघाला. शोध मोहिमेदरम्यान डीआरजी सैनिक आणि नक्षलवादी समोरासमोर आले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. गोळीबारात या परिसरात राहणाऱ्या सहा महिन्यांच्या मुलीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला, तर तिच्या आईलाही हाताला गोळी लागली, त्यामुळे ती जखमी झाली.
चकमकीत लहान बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच विजापूरचे एएसपी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने मृत मुलीसह जखमी आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या चकमकीत काही नक्षलवादीही जखमी झाले असून त्यात भैरमगड एरिया कमिटीचा सचिव चंद्रण्णा आणि इतर काही जणांचा समावेश आहे. सध्या पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.