लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:52 IST2025-10-17T17:49:43+5:302025-10-17T17:52:50+5:30
Chhattisgarh Naxalite Surrender: केंद्र सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश!

लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
Chhattisgarh Naxalite Surrender: केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. छत्तीसगडमध्ये आज तब्बल 210 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांनी आपली 153 शस्त्रंही सुरक्षादलांकडे जमा केली. राज्य सरकार आणि सुरक्षा यंत्रणांच्या मते, ही आतापर्यंतची सर्वात मोठी सामूहिक आत्मसमर्पणाची कारवाई आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांच्या उच्चाटनासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीपूर्वीच इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलवादी हत्यार टाकून, आत्मसमर्पण करणं हे नक्षलविरोधी मोहिमेसाठी एक मोठं यश आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 60 नक्लवाद्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर आता छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात अत्मसमर्पण केलं आहे.
या आत्मसमर्पणानंतर उत्तर बस्तर परिसर आता नक्षलमुक्त घोषित केला जाऊ शकतो. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आता फक्त दक्षिण बस्तरचं क्षेत्र उरलं आहे, जिथे सुरक्षादल आणि राज्य सरकार मिळून अंतिम मोहिमेची तयारी करत आहेत.
Live-पूना मारगेम :पुनर्वास से पुनर्जीवन https://t.co/G4Qrgacu2A
— Vishnu Deo Sai (@vishnudsai) October 17, 2025
मुख्यमंत्री विष्णू सहाय यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री विष्णू सहाय यांनी आत्मसमर्पण कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, “आजचा दिवस फक्त बस्तरसाठी नाही, तर संपूर्ण छत्तीसगड आणि देशासाठी ऐतिहासिक आहे. जे युवा वर्षानुवर्षं माओवादी विचारसरणीच्या अंधारात अडकले होते, त्यांनी आज संविधानावर आणि विकासाच्या नीतिवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी बंदूक खाली ठेवून संविधान उचललं आहे. हे दृश्य माझ्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक आहे. बदल फक्त शस्त्रांनी नाही, तर नीतिमत्ता आणि विश्वासाने येतो. हे आत्मसमर्पण आमच्या सरकारच्या यशाचं नव्हे, तर शांततामय छत्तीसगडच्या भविष्यासाठीच्या शिलान्यासाचं प्रतीक आहे.”
इतिहासातील सर्वात मोठं आत्मसमर्पण
बस्तरचे महानिरीक्षक (IG) सुंदरराज पट्टिलिंगम यांनी सांगितलं की, “माओवादी कार्यकर्त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल. त्यांनी AK-47, INSAS, LMG, SLRसह एकूण 153 शस्त्रं जमा केली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी आत्मसमर्पण यापूर्वी कधी झालं नव्हतं.” त्यांच्या मते, या घटनेनंतर इतर नक्षलवादीही लवकरच आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे.
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी नेत्यांमध्ये 110 महिला आणि 98 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ते भाकपा (माओवादी) संघटनेच्या विविध पातळ्यांवर कार्यरत होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये रुपेश उर्फ सतीश (CCM), भास्कर उर्फ राजमन मंडावी, रनिता, राजू सलाम, धन्नू वेट्टी उर्फ संटू आणि रतन एलम यांसारखे शीर्ष माओवादी नेते होते. या सर्वांकडून 19 AK-47 रायफल, 17 SLR, 23 INSAS, 1 INSAS LMG, 36 .303 रायफल, 4 कार्बाइन, 11 BGL लाँचर, 41 बोर बंदुका आणि 1 पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे.