भाजपा कार्यकर्त्याने शब्द पाळला; BJP उमेदवार पराभूत होताच मुंडन केले, मिशा कापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:50 IST2023-12-06T16:49:34+5:302023-12-06T16:50:10+5:30
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-२ असा विजय मिळवला.

भाजपा कार्यकर्त्याने शब्द पाळला; BJP उमेदवार पराभूत होताच मुंडन केले, मिशा कापल्या
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-२ असा विजय मिळवला. तेलंगणा आणि मिझोराम वगळता तीन राज्यांत भाजपाची सत्ता आली. मध्य प्रदेशात सत्ता कायम राखण्यात भाजपाला यश आले, तर छत्तीसगड आणि राजस्थानात काँग्रेसला सुरूंग लावत भाजपाने सत्ता काबीज केली. राजस्थानच्या जनतेने परंपरा कायम राखली पण छत्तीसगडमधील निकालाने राजकीय पंडितांना देखील धक्का बसला. भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असूनही काँग्रेसला सत्ता राखता आली नाही. भाजपाने राज्यात विजय मिळवला पण खल्लारी विधानसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला अन् भलत्याच कारणामुळे ही जागा चर्चेत आली.
महासमुंद जिल्ह्यातील खल्लारी विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवाराच्या विजयासाठी एका कार्यकर्त्याने पैज लावली होती. मात्र, भाजपाचा उमेदवार निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजपाचा एक कार्यकर्ता डेहराम यादव याने मिशा कापल्या आणि मुंडन केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार पडल्यास मी मुंडन करेन असा दावा डेहरामने केला होता. ४८ वर्षीय डेहरामने खल्लारी विधानसभेतील भाजपा उमेदवार अलका चंद्राकर यांच्या विजयाचा दावा करत मित्रासोबत पैज लावली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे निवडणूक हरल्यानंतर त्याने मिशा कापून दिलेला शब्द पाळला.
भाजपाचा काँग्रेसला दे धक्का
दरम्यान, डेहरामने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अलका चंद्राकार यांच्या विजयाचा दावा केला होता. पण, जनतेने कौल काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने दिला. तसेच भाजपा उमेदरावाराचा पराभव झाल्यास मी मिशा कापेन आणि मुंडन करून गावभर फिरेन असा शब्द डेहरामने त्याच्या मित्राला दिला होता. आता निकाल लागल्यानंतर त्याने दिलेला शब्द पाळला. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक पार पडली. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत भाजपाने ५४ जागा जिंकून सत्ता मिळवली. तर काँग्रेसला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय १ जागा इतरांच्या खात्यात गेली.