Sanjay Dahariya : ४ वेळा कॅन्सरला हरवलं, ७ वर्षे मृत्यूशी झुंज; उपचारासाठी नव्हते पैसे, आता जिद्दीने स्वप्न केलं साकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 14:14 IST2026-03-19T14:13:42+5:302026-03-19T14:14:03+5:30
Sanjay Dahariya : संजय डहरिया यांनी सलग ७ वर्षे कॅन्सरशी लढा दिला आणि त्यानंतर यूपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवलं.

Sanjay Dahariya : ४ वेळा कॅन्सरला हरवलं, ७ वर्षे मृत्यूशी झुंज; उपचारासाठी नव्हते पैसे, आता जिद्दीने स्वप्न केलं साकार
छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील बेलटुकरी येथून प्रेरणादायी घटना समोर आली आहे. बेलटुकरी येथील एका शेतकऱ्याचा मुलगा संजय डहरिया यांच्या यूपीएससी निवडीची गोष्ट अत्यंत वेदनादायी आणि आव्हानात्मक आहे. संजय डहरिया यांनी सलग ७ वर्षे कॅन्सरशी लढा दिला आणि त्यानंतर यूपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवलं.
संजय डहरिया यांनी ७ वर्षांत चार वेळा कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकली आणि त्यानंतर यूपीएससी उत्तीर्ण केली. जिद्दीनेच भरारी घेता येते, हे सिद्ध केलं आहे. संजय यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेले. याच दरम्यान २०१२ मध्ये त्यांना कॅन्सर झाला. उपचारासाठी पैसे नव्हते. वडील लखन डहरिया आणि आई रेशम डहरिया यांच्यासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं. तरीही मुलासाठी आई-वडिलांनी उपचारावर खूप खर्च केला.
७ वर्षे कॅन्सरशी झुंज
संजय हे महासमुंद जिल्ह्यातील बेलटुकरी गावचे रहिवासी आहेत. गावापासून यूपीएससीमधील निवडीपर्यंतचा प्रवास संघर्षाचा आहे. यूपीएससीच्या तयारीपूर्वी डहरिया ७ वर्षे कॅन्सरशी झुंज देत होते. या काळात त्यांनी देवाकडे 'असं जीवन का दिलं?' अशी तक्रारही केली होती. मात्र त्यांनी हार मानली नाही. कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली.
आयएएस बनण्याचं स्वप्न पाहिलं
पाचवीपर्यंतचं शिक्षण गावातील सरकारी शाळेत घेतलं. पाचवीत असताना त्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी झाली. त्यांनी नवोदय विद्यालयातून १२ वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. दहावीत असताना एका आयएएस अधिकाऱ्याला पाहून संजय यांनी आयएएस बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, २०१२ मध्ये त्यांना कॅन्सरने गाठलं. उपचारादरम्यान पालकांची आर्थिक ओढाताण झाली, पण त्यांनी मुलाचे उपचार थांबवले नाहीत.
स्वप्न साकार करण्याचा निर्णय
२०१२ ते २०१८ या काळात त्यांनी चार वेळा कॅन्सरशी लढा दिला आणि २०१८ मध्ये ते पूर्णपणे बरे झाले. त्यानंतर त्यांनी आपलं स्वप्न साकार करण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये रायपूरच्या चौबे कॉलनीतील १०० स्क्वेअर फूटच्या भाड्याच्या खोलीत राहून त्यांनी तयारी सुरू केली. नालंदा परिसर येथील लायब्ररीत बसून त्यांनी अभ्यास केला. अखेर ४ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर संजय डहरिया यांनी UPSC 2025 मध्ये ९४६ वा रँक मिळवून जिद्दीचा नवा आदर्श निर्माण केला. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं.
संजय यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं की, "बालपणी आमच्या घरात खाण्यापिण्याची सोय नसायची. आई अनेकदा उपाशी राहायची. ती चार मुलांना जेवण द्यायची, पण स्वतः मात्र काहीच खायची नाही. २०१२ मध्ये कॅन्सर असल्याचं निदान झालं, त्यानंतर ७ वर्षे मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. या आजारामुळे शरिराला असह्य वेदना झाल्या, पण मनातील जिद्द कायम होती."