मृत्यूला हरवणारा हिराे; १०५ तासांनी ‘तो’ बोअरवेलमधून सुखरूप बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 07:43 IST2022-06-16T07:40:05+5:302022-06-16T07:43:01+5:30
बोअरवेलमध्ये १०५ तास मृत्यूशी झुंज देऊन ११ वर्षांचा राहुल सुखरूप बाहेर आला, तेव्हा कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले.

मृत्यूला हरवणारा हिराे; १०५ तासांनी ‘तो’ बोअरवेलमधून सुखरूप बाहेर
रायपूर :
बोअरवेलमध्ये १०५ तास मृत्यूशी झुंज देऊन ११ वर्षांचा राहुल सुखरूप बाहेर आला, तेव्हा कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले. ही घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यत आले आले असून, त्याची प्रकृती सुधारत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या मोठ्या ऑपरेशनच्या यशस्वीतेबद्दल टीममधील सर्वांचे कौतुक केले आहे.
छत्तीसगडच्या जांजगीर चांपा जिल्ह्यात शुक्रवारी बोअरवेलच्या खड्ड्यात राहुल पडला होता. ६० फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम काम करत होती. पिहरीद गावातील राहुल आपल्या घराजवळ खेळत असताना शुक्रवारी दुपारी बोअरवेलच्या खोल खड्ड्यात पडला. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच रात्री उशिरा ऑपरेशन सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र शुक्ला यांच्या नेतृत्वात प्रशासनाची टीम गावात दाखल झाली होती.
या मोहिमेत १२० पोलीस, बांधकाम विभागाचे इंजिनिअर, एनडीआरएफचे ३२ कर्मचारी, एसडीआरएफचे १५ कर्मचारी आणि होमगार्डचे सात जवान दिवसरात्र मेहनत करत होते. या कामासाठी एक स्टोन ब्रेकर, तीन पोकलेन, तीन जेसीबी, दहा ट्रॅक्टर, तीन वॉटर टँकर आदी भली मोठी यंत्रणा सज्ज होती.
मोहिमेत अधिकाऱ्यांची फौज
या मुलाला बाहेर काढण्यासाठी रोबोटिक रेस्क्यू ऑपरेशनचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर बोगदा बनविण्याचे काम सुरू केले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शनिवारी गुजरातहून रोबोट इंजिनिअरला बोलविण्यात आले. ओडिशातून एनडीआरएफ टीमलाही बोलविण्यात आले. या मोहिमेत चार आयएएस, दोन आयपीएस, पाच अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चार एसडीओपी, पाच तहसीलदार आणि आठ पोलीस ठाणे प्रमुख सहभागी होते.